विशाळगड : सुभाष पाटील
ऐतिहासिक पावनखिंड शेकडो पणत्यांनी उजळून निघाली. शाहुवाडी येथील स्वराज्य प्रतिष्ठान व युगंधर फिल्मच्या वतीने येथे (गुरुवार) (दि३१) रात्री दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात हा परिसर दणाणून गेला. (Diwali 2024)
ज्या गड-किल्ल्यांमुळे तसेच ऐतिहासिक पावनभूमीमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड-किल्ले, पावनभूमी ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दीपोत्सव करत असल्याचे स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ झुंजार माने यांनी सांगितले. शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि बाजीप्रभूच्या पराक्रमाने पावन झालेल्या या भूमीचे संवर्धन करण्याची जबाबदारी शिवप्रेमीनी घ्यायला हवी असेही ते म्हणाले.
बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे, ऐतिहासिक भूमीचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील असते. प्रारंभी स्मृतिस्थळाचे पूजन स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ झुंजार माने यांनी करून दीपोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्मृतिस्थळ, पायरी मार्ग शेकडो पणत्यांनी उजळून गेला. दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. याचेच औचित्य साधून पावनखिंडीत मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासाला उजाळा देत स्वराज्य प्रतिष्ठान व युगंधर फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी स्वच्छता मोहीम राबवून शिवकार्य केले जाते. दीपोत्सवास डॉ.झुंझार माने, सचिन चौगुले, प्रविण पांढरे, विश्वजीत पांढरे व वारुळ येथील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.