कोल्हापूर : कोल्हापूर शहराला रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने सुमारे दीड तास झोडपून काढले. सायंकाळचा प्रहर संपून रात्रीचा काळोख दाटत होता. एस.एस.सी. बोर्डच्या परिसरात स्काय गार्डन या रहिवासी संकुलाच्या परिसरात एक चार-सहा महिने वय असलेले वासरू पोटातील वेदनांनी हंबरत होते. कासावीस होऊन तडफडत होते. संकुलातील नागरिकांचे मन हेलावून टाकत होते. कोणी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होते. कोणी पोटावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करत होते. बघता बघता नागरिकांची गर्दी वाढली. एकाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी वासराचे दुखणे ओळखले आणि उपचार सुरू केले. वासराच्या तोंडात थेट हात घालून डॉक्टरांनी त्याच्या अन्न नलिकेत अडकलेला कचरा बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि धक्का बसला. वासराच्या घशातून प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याची बाटली अशा एक एक वस्तू बाहेर येत होत्या. हा कचरा बाहेर काढताच तडफडणार्या वासराने सुस्कारा सोडला अन् मुक्या जीवाला संजीवनी मिळाली.
या घटनेने कोल्हापूरच्या शिस्त न पाळणार्या नागरिकांना एक मोठी चपराक दिली आहे. नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांचा मुबलक वापर करतात. घरातील अन्न आणि कचरा प्लास्टिकच्या पिशव्यातून घराबाहेर ठेवतात आणि त्यामुळे निष्पाप जनावरांवर हकनाक आपला जीव गमवण्याचीही वेळ येते. या नागरिकांच्या रक्तामध्ये शिस्त पोहोचवण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेला स्वीकारावयाचे आहे.
शिवाय नागरिक बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या पिशवीला हात लावणार नाही, असा निर्धार व्यक्त करित नाहीत तोपर्यंत मुक्या जनावरांच्या जीवावरील संकट कायम राहणार आहे. कोल्हापुरात प्लास्टिकचा कचरा ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिकांच्या बेफिकीरीमुळे गटारे आणि मुख्य ड्रेनेज लाईन्समध्ये दररोज टनाने प्लास्टिक कचरा काढण्याचे काम महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाला करावे लागत आहे. त्याची छायाचित्रे दै. ‘पुढारी’ने वारंवार प्रसिद्ध केली. शहरातील ब्रह्मेश्वर बागेतील एका मॅनहोलमध्ये तर आठवड्यातून चार वेळा ड्रेनेज तुंबते. प्लास्टिक कचर्याच्या सोबतीला दारूच्या बाटल्यांचा खचही बाहेर पडतो. शहरातील गटारे, खुल्या जागा या जणू स्वत:च्या मालकीच्या असल्याच्या थाटात नागरिक प्लास्टिक कचरा टाकत असतील, तर त्यांना वळणावर आणण्यासाठी महापालिकेला पावले उचलावी लागतील.