Kolhapur Municipal Corporation 
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation | सभागृह महापौरांच्या आदेशाने चालते की आयुक्तांच्या? अजेंड्यावरून प्रश्नोत्तरे काढण्याचे धाडस केलेच कसे?

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे सभागृह महापौरांच्या आदेशाने चालते की आयुक्तांच्या? अजेंड्यावरून प्रश्नोत्तरे काढण्याचे धाडस केलेच कसे? हे बेकायदेशीर कृत्य आहे, असे म्हणून सोमवारी (दि. 20) झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महासभेच्या अजेंड्यातून प्रश्नोत्तरे गायब झाली. त्यावर नगरसेवकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. अध्यक्षस्थानी महापौर रूपाराणी निकम होत्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते.

नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा

नगरसेवकांनी लेखी प्रश्न द्यायची आणि प्रशासनाने लेखी उत्तरे द्यायची ही पद्धत योग्य नाही, असे सांगून प्रा. जयंत पाटील यांनी सभागृह महापौरांच्या आदेशाने चालते, आयुक्तांच्या नाही, असे सांगितले. राजेश लाटकर यांनी प्रश्नोत्तरे ही अधिनियमात तरतूद असल्याचे निदर्शनास आणून दिले. शारंगधर देशमुख यांनी सात दिवसांत उत्तरे मिळत नसल्याचे सांगितले. मुरलीधर जाधव यांनी सभागृहातील विषय पुन्हा चर्चेला येऊ नयेत, असे सांगितले. इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास यांनी हा निर्णय नगरसेवकांच्या अधिकारावर गदा असल्याचे सांगितले.

...अन्यथा अधिकार्‍यांचे एसी काढून घेणार महापालिकेच्या सभागृहात फॅन

आहेत. सध्या प्रचंड उष्मा असल्याने नगरसेवक हैराण झाले आहेत. परिणामी, अनेक नगरसेवक आत-बाहेर करत असतात. त्यामुळे महापौर निकम यांनी सभागृहात एसी बसविण्याचे आदेश दिले. पुढील सभेपूर्वी एसी बसले नाहीत, तर अधिकार्‍यांचे एसी काढून घेणार आणि ते सभागृहात बसवणार, असा इशाराही दिला.

रंकाळा तटबंदीसाठी 1.17 कोटीचा प्रस्ताव मंजूर

ऐतिहासिक रंकाळा तलावाची पदपथ उद्यान येथील तटबंदी ढासळली आहे. त्यामुळे रंकाळा तलावाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, तटबंदी बांधण्यासाठी महापालिकेने 1 कोटी 17 लाखांचा प्रस्ताव तयार करून महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. हा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला.

नगरसेवकांची इंदूरला ट्रीप...

कोल्हापूर महापालिकेला ‘ड’ वर्गातून ‘अ’ वर्गात आणायचे आहे. त्यांतर्गत नगरसेवकांसाठी महापौर स्मार्ट वॉर्ड योजना जाहीर केली असून, त्यांतर्गत 25 लाख, 15 लाख व 10 लाख असा प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळणार आहे. महापौर निकम यांनी सभागृहात ही माहिती दिली. तसेच, विविध विकासकामांची माहिती होण्यासाठी 10 मेपर्यंत नगरसेवकांची इंदूरला अभ्यास दौरा म्हणजे ट्रीप नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT