कोल्हापूर

धैर्यशील माने यांच्या विजयात इचलकरंजीकरांचा मोठा वाटा

Arun Patil

उत्कंठावर्धन झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत विजयी झालेल्या धैर्यशील माने यांच्या विजयात इचलकरंजीकरांचा ठसा दुसर्‍यांदा उमटला आहे. इचलकरंजी पाठोपाठ हातकणंगले व शिरोळ येथील मतदारांनी दिलेल्या मताधिक्यामुळे माने यांचा विजय सुकर झाला, तर पन्हाळा, शिराळा, वाळवा, शाहूवाडी व इस्लामपूर या ठिकाणी सत्यजित पाटील-सरुडकर यांचे मताधिक्य वाढू नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी दिलेली सरस झुंजही विजयासाठी कारणीभूत ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष जोडण्याही पुन्हा एकदा माने यांना गुलाल लावून गेल्या.

धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला होता, तर उमेदवार संपर्कात नसतात, प्रश्नांची सोडवणूक गतीने होत नाही, अशा टीका करून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. मतदारांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करीत सत्यजित पाटील-सरुडकर व माजी खा. राजू शेट्टी या दोन दिग्गजांना महायुतीचे नेते, पदाधिकारी यांच्या बळावर माने यांनी जोरदार लढत दिली. माने यांचा प्रचारातील बहुतांशी वेळ समजूत काढण्यातच गेला. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांच्या प्रचाराने चांगलीच गती घेतली.

इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी माने यांना गतवेळी तब्बल 75 हजारांचे मताधिक्य देत इचलकरंजीकरांनी माने यांच्यावर विश्वास दर्शवला होता. यंदाही त्याच पद्धतीने चुरशीने मतदान करून तब्बल 39 हजार 172 अशी सर्वाधिक मते देऊन विजयी मिळवून दिला. मुख्यमंत्र्यांच्या जोडण्या आणि आ. प्रकाश आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, राहुल आवाडे आदींसह महायुतीच्या नेत्यांनी लढवलेली खिंड माने यांच्या पथ्यावर पडली. यापाठोपाठ गतवेळेप्रमाणे हातकणंगले मतदार संघानेही तब्बल 17 हजार 493 इतके मताधिक्य यंदाही देऊन माने यांचा विजय सुकर केला.

हातकणंगलेत महाविकास आघाडीकडून आ. राजू आवळे, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, माजी आ. राजीव आवळे यांनी सरुडकर यांची प्रचार धुरा हाती घेतली होती, तर दुसरीकडे आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे तसेच महाडिक कुटुंब, अरुणराव इंगवले, अशोकराव माने यांनी धैर्यशील माने यांची प्रचार धुरा हाती घेतली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली होती.

शिरोळ हा राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला मानला जातो. गतवेळी राजू शेट्टी यांनी 7 हजारांचे मताधिक्य येथून घेतले होते. यंदा मात्र शिरोळ तालुक्यातून 5700 मतांचे लीड माने यांना मिळाले. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, गुरूदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोलाची साथ लाभली.

वाळवा तालुक्यात माने यांना मताधिक्य मिळाले नसले, तरी तेथील प्रामुख्याने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे राहुल व सम—ाट महाडिक, निशिकांत पाटील, विक्रम पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पोवार आदींनी निकराची झुंज दिल्याने सत्यजित पाटील-सरुडकर यांचे मताधिक्य कमी राहिले.

आ. डॉ. विनय कोरे व जनसुराज्य पक्षाची भूमिका शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा आदी भागात निर्णायक ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून आ. डॉ. कोरे यांच्यामुळे माने यांचा गट अबाधित राहतो, ही परंपराही यावेळी कायम राहिली. सत्यजित पाटील-सरुडकर यांना इस्लामपूर मतदार संघात 17 हजार 481, शिराळा मतदार संघात 9 हजार 281, शाहूवाडीत 18 हजार 287 इतके मताधिक्य मिळाले. मात्र, इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले या तिन्ही मतदार संघातील अधिकच्या मताधिक्यामुळे माने विजयापर्यंत पोहोचले.

माजी खा. राजू शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात

दोन वेळा खासदारकी मिळवलेल्या राजू शेट्टी यांनी यंदाही कडवे आव्हान निर्माण केले होते. मतदार संघात शाहूवाडी, शिराळा, वाळवा, शिरोळ, हातकणंगले आदी ठिकाणी शेतकरी चळवळीमुळे त्यांची मोठी ताकत आहे. मात्र, यंदा सहाही मतदार संघात ते तिसर्‍या क्रमांकावर दिसून आल्याने त्यांचा निर्णय चुकला, अशी प्रतिक्रिया उमटत होती. डी. सी. पाटील यांना 28 हजार मते मिळाल्याने वंचितचा फॅक्टरही यंदा प्रभावी ठरला नाही.

SCROLL FOR NEXT