कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या सोमवारी (दि. २२) झालेल्या मासिक सभेत सरपंच पती कुलदीप कदम यांनी पत्र फाडले. या झालेल्या प्रकाराची नोंद करून कारवाई करावी तसेच याबाबत विशेष सभा घ्यावी अशी सूचना शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी दिल्याची माहिती ग्रामसेवक आप्पालाल मुल्ला यांनी दिली.
खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या सोमवारी (दि. २२) झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीच्या कोपेश्वर मंदिर पुढील दर्शनीय भाग व स्टॅन्ड परिसर पुरातत्व खात्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेण्यात यावी अशा आशयाचे पत्र ग्रामसेवक मुल्ला आणि सरपंच कदम यांच्या सहीचे पत्र सभेपुढे ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवून सभागृहाचा याबाबत ठराव करून त्याचीही इतिवृत्तावर नोंदणी करावी अशा सूचना गट विकास अधिकारी कवितके यांनी दिलेल्या आहेत. यामुळे सरपंच सारिका कदम यांच्या पुढे आता मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सभेत चर्चा सुरू असताना सरपंच कदम यांचे पती कुलदीप कदम हे सभागृहात आले. ग्रामसेवक यांच्याकडून पत्र घेत पत्राचा मागचा पुढचा विचार न करता फाडले. त्यानंतर सभागृहात ग्रा.प. सदस्य इर्शाद मुजावर, अमित कदम यांनी सरपंच पती कदम यांनी पत्र फाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे.याची इतिवृत्तावर नोंद घेऊन सरपंच पती कुलदीप कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी गट विकास अधिकारी कवितके यांची आज गुरुवारी (दि. २५) भेट घेऊन मार्गदर्शनाची मागणी केली. त्यानंतर घडलेल्या प्रकारणाची इतिवृत्तावर नोंद घेऊन कारवाई करावी तसेच घडल्या प्रकाराबाबत विशेष सभा बोलवून सभागृहात घडलेल्या प्रकारावर कारवाई करणे बाबतचा ठरावही करावा अशी सूचना त्यानी दिल्याचे ग्रामसेवक मुल्ला यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी कवितके यांनी सरपंच पती कुलदीप कदम यांनी केलेल्या प्रकाराबाबत विशेष सभा घेऊन कारवाईचा ठराव करून घ्यावे अशी सूचना ग्रामसेवकांना दिले आहेत. विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून सरपंच कदम असणार आहेत. सभेत पतीने फाडलेल्या पत्राचे समर्थन केल्यास सरपंचाच्या पुढे मोठी अडचण निर्माण होणार आहे आणि ठरावाच्या बाजूने समर्थन दिल्यास पती विरोधात होणाऱ्या कारवाईला समर्थन दिल्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे त्यांची अवस्था इकडे… आड तिकडे विहीर !! अशी होणार आहे. विशेष सभेत त्या काय निर्णय घेणार याकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीत सरपंचांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे हे मात्र निश्चित.