१) कोल्हापूर : गणेशमूर्तीवर रंगाचा अखेरचा हात फिरवण्यात तल्लीन मूर्तिकार. २) सुरक्षेसाठी गणेशमूर्तींवर प्लास्टिकचे अच्छादन करण्यात आले आहे. ३) तयार झालेल्या गणेशमूर्तींची मांडणी करताना मूर्तिकार. ४) गणरायाच्या मूर्तीला रंगकाम करताना महिला कारागीर.  (सर्व छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ganesh Festival | बाप्पा येतोय... कुंभारवाडा गजबजतोय

अंतिम हात फिरविण्यात मूर्तिकार दंग : बुकिंगसाठी वर्दळ; मंडळांच्या मूर्तीही सज्ज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल आता कुंभारवाड्यांमध्ये ठळक होऊ लागली आहे. सोमवारी (दि. १४) गणरायाची प्रतिष्ठापना होणार असल्याने बापट कॅम्प, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली यासह शहरातील विविध कुंभारवाड्यांमध्ये सध्या अक्षरशः लगबग सुरू आहे. कुठे बाप्पांच्या मूर्तींवर रंगाचा अंतिम हात फिरत आहे, कुठे डोळ्यांची रंगसंगती केली जात आहे तर कुठे मुकुट, दागिने आणि वस्त्रांची सजावट पूर्ण केली जात आहे. मूर्तिकारांसह त्यांचे कुटुंबीयही या कामात गुंतले आहेत. शुक्रवारी कुंभारवाड्याची सफर करताना, बाप्पा येतोय... कुंभारवाडा गजबजतोय हेच चित्र दिसून आले.

पावसाचा दिलासा... ग्राहकांची लगबग

पावसाने उघडीप दिल्याने मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर मूर्ती व्यवस्थित सुकणे आवश्यक असल्याने पावसाचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मूर्तिकारांची धावपळ सुरू होती. मात्र, सध्या मिळत असलेल्या उघडिपीमुळे रंगकामाचा वेग वाढला असून शेवटच्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यास मदत होत आहे. दरम्यान, तयार झालेल्या गणेशमूर्ती रांगेत आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. या मूर्ती पाहून बुकिंगसाठी आता ग्राहकांची वर्दळही वाढली आहे. कुटुंबासह कुंभारवाड्यांत आलेले नागरिक आपल्या आवडीच्या मूर्तीची निवड करताना दिसत आहेत. एखादी मूर्ती आवडली की, तिचे रूप, वैशिष्ट्य, रंगसंगती, उंची आणि किंमत यावर कुटुंबातील सदस्यांमध्ये चर्चा रंगत आहे. लहान मुलांना आवडलेली मूर्ती पालकांना दाखविली जात आहे. पसंती ठरल्यावर मूर्तीचे बुकिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

मंडळांचे कार्यकर्ते कुंभारवाड्यांत

घरगुती गणेशमूर्तींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीची पाहणी करण्यासाठी कुंभारवाड्यांत येत आहेत. काही मंडळांनी आधीच मूर्ती निश्चित केल्या असून आता त्या घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली आहे. मोठ्या मूर्ती सुरक्षितपणे बाहेर काढणे, वाहनांमध्ये ठेवणे आणि मंडपापर्यंत पोहोचविण्याची तयारी यामुळे कुंभारवाडे बाप्पामय झाले आहेत. मांडलेल्या मूर्ती, रंगकामाचा सुगंध, मूर्तिकारांच्या हातातील कुंचले आणि बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आलेल्या कुटुंबांची लगबग यामुळे संपूर्ण परिसराला उत्सवी रूप आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT