कोल्हापूर

कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये एमआरआयच्या आशा पल्लवित

दिनेश चोरगे

कोल्हापूर : 'सीपीआर'मध्ये एमआरआय उपकरणाच्या फायलीवरील धूळ झटकली असून 26 कोटींच्या प्रस्तावाची फाईल प्रशासकीय मान्यतेसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव यांच्या टेबलावर पोहोचली आहे. त्यामुळे सीपीआरसाठीच्या एमआरआय उपकरणाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अत्याधुनिक आणि दर्जेदार उपकरण मिळविण्यासाठी सीपीआर प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

सीपीआर मध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे एमआरआय उपकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर वारंवार फक्त चर्चा झाली. पण ठोस निर्णयाअभावी फाईल गठ्ठ्यात धूळ खात पडून होती. चार दिवसांपूर्वी ही फाईल पुढे सरकली आहे. सीपीआरमध्ये दररोज 1500 ते 1600 बाह्य रुग्णांची नोंदणी होते. यामधील 200 ते 250 रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. गंभीर आणि अपघातग्रस्त रुग्णांसाठी हे रुग्णालय देवदूत आहे.

पण येथे एमआरआय उपकरणाअभावी रुग्णांची हेळसांड होत होती. पुढील निदान करण्यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. अचूक निदान आणि उपचारासाठी हे उपकरण महत्त्वाचे असल्याचे सीपीआरने वरिष्ठ कार्यालयास कळविले होते. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या उपकरणासाठी आपण लक्ष देऊ, असे सीपीआर प्रशासनाला सांगितले होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी एमआरआय उपकरणाची फाईल प्रशासकीय मान्यतेसाठी देण्याची सूचना केल्यानंतर 26 कोटींच्या प्रस्तावाची फाईल पुढे सरकली आहे. येत्या काही महिन्यात हे उपकरण सीपीआरच्या रुग्णसेवेत येणार असल्याची खात्री झाली आहे.

अत्याधुनिक उपकरणच हवे

दर्जेदार सोयी-सुविधांनी सीपीआर परिपूर्ण होत आहे. सिटी स्कॅन, सोनोग्राफ्रीसह अन्य उपकरणे अत्याधुनिक आहेत. त्यामुळे रुग्ण तपासणीनंतर होणारे वेळेत व अचूक निदान होते. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे अधिक सोयीचे बनले आहे. एमआरआय उपकरण देखील अत्याधुनिकच हवे, असा येथील डॉक्टरांचा हट्ट आहे.

उपचार मोफत अन् खासगीत खर्च

सीपीआरमधील सर्व तपासण्या माफक आणि मोफत केल्या जातात. मात्र, रुग्णास एमआरआय करावा लागता तर रुग्णाला खासगीत न्यावे लागते. खासगीतील तपासणीचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे अनेक रुग्ण अर्धवट उपचार सोडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT