कोल्हापूर : ‘टीईटी’ पेपरफुटीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागत आहेत. पाटण्यातील मुख्य सूत्रधार रितेशकुमार, सलाम यांच्यासह बिहार टोळीतील सातही साथीदारांची महिन्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये गोपनीय बैठक झाली होती. त्यामध्ये पेपरफुटीसह आर्थिक सौद्याचा प्लॅन ठरल्याची माहिती पुढे येत आहे. सातारा जिल्ह्यातील गायकवाड बंधूंसह पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख एजंटांवर आर्थिक उलाढालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.
कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यभर बहुचर्चित ठरलेल्या ‘टीईटी’ पेपरफुटीचा भांडाफोड झाला आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह 19 जणांना अटक केली आहे. ‘टीईटी’ पेपरफुटीसंबंधित कोल्हापूर, सांगलीसह सातारा व पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील आणखी काही एजंटांची नावे चौकशीतून पुढे येत आहेत. ‘टीईटी’ पेपरफुटीचे रॅकेट बहुतांशी जिल्ह्यांत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे. पेपरफुटी प्रकरणाची गृह खात्याने गंभीर दखल घेत तपासाची व्याप्ती वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
‘टीईटी’ पेपरफुटीप्रकरणी बिहार आणि उत्तर प्रदेश येथील आंतरराज्य टोळीचे कनेक्शन पुढे आले आहे. म्होरक्या रितेशकुमार, सलाम यांच्यासह टोळीतील सातही संशयित तीन वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील गायकवाड बंधूंच्या संपर्कात आहेत. तीन वर्षांपूर्वी ही टोळी सातारा येथे दाखल झाली होती. त्यानंतर महिन्यापूर्वीही मुख्य सूत्रधार रितेशकुमार, सलाम यांच्यासह त्यांच्या साथीदारांची सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये गोपनीय बैठक झाली होती. त्यात गायकवाड बंधूंसह पश्चिम महाराष्ट्रातील काही एजंटांची उपस्थिती होती, अशीही माहिती चौकशीतून पुढे आल्याचे समजते.
बैठकीत ‘टीईटी’ पेपरफुटीसह आर्थिक व्यवहारासंदर्भात गायकवाड बंधूंवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती, असेही समजते. तपास पथकाने त्याद़ृष्टीने तपासाला गती दिली आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख एजंट कोल्हापूर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. एक-दोन दिवसांत संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.