TET paper leak scam | प्राचार्य, प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करा 
कोल्हापूर

TET paper leak scam | प्राचार्य, प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या सोळांकूरच्या महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य, मिरज महाविद्यालयातील पूर्णवेळ प्राध्यापक व बिद्री येथील महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील ‘त्या’ प्राध्यापकावर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी संबंधित महाविद्यालयांना बुधवारी दिले. याबाबतचे पत्र सहसंचालकांनी संबंधित संस्थांना पाठवले आहे.

मुरगूडजवळील सोनगे (ता. कागल) येथे ‘टीईटी’ पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. या छाप्यात पाच शिक्षकांसह 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सोळांकूर येथील एका महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्याचा समावेश आहे. याशिवाय, मिरज येथील एक प्राध्यापक व बिद्री येथील तासिका तत्त्वावर काम करणार्‍या प्राध्यापकाचा यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. संबंधित प्राध्यापकांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पत्र मुरगूड पोलिसांनी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठवले होते. त्यानुसार विभागीय सहसंचालकांनी संबंधित प्राचार्य व दोन प्राध्यापकांवर नियमानुसार शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील दोन शिक्षक हे माध्यमिकचे आहेत. त्यानुसार शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याशी मंगळवारी पत्रव्यवहार करून कारवाई करण्यासंदर्भात कळवले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्याशी बुधवारी संपर्क साधला. ते म्हणाले, विभागीय शिक्षण उपसंचालकांचे पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. याबाबतची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून तत्काळ घेईन. शासन नियमानुसार, एखादा व्यक्ती 48 तास तुरुंगात राहिला, तर त्याचे आपोआप निलंबन होते. गुरुवारी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित शिक्षण संस्थेला ‘त्या’ शिक्षकांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. म्हणाले. प्राचार्य, प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT