कोल्हापूर : ‘टीईटी’ पेपरफुटीप्रकरणी आंतरराज्य टोळ्यांचे कनेक्शन चव्हाट्यावर येत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश येथील खासगी ठेकेदारांसह सराईतांचे लागेबांधे निष्पन्न होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. प्राथमिक चौकशीत आंतरराज्य टोळ्यांचे चार वर्षांपासून कारनामे सुरू असल्याची धक्कादायक माहितीही पुढे येत आहे. पोलिसांची विशेष पथके बिहार, उत्तर प्रदेशकडे रवाना होत आहेत.
मुख्य सूत्रधार महेश गायकवाड, संदीप भगवान गायकवाड (रा. बेलवडे, ता. कराड) यांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत. ‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात सरकारी यंत्रणांसह शैक्षणिक संस्थांमधील काही महत्त्वाच्या व्यक्तींचा सहभाग असावा का, याचीही सखोल चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
‘टीईटी’सह शासकीय कर्मचारी भरतीप्रकरणी प्रश्नपत्रिकांची छपाई आणि वितरणासाठी खासगी यंत्रणांवर जबाबदारी सोपविण्यात येते. या रॅकेटमधून हा घोटाळा झाला असावा, अशी माहिती आहे. जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीत बिहार, उत्तर प्रदेश येथील काही म्होरक्यांची नावे चव्हाट्यावर येत आहेत. आंतरराज्य टोळीतील संशयितांच्या चौकशीनंतर ‘टीईटी’ पेपरफुटीच्या व्याप्तीचा उलगडा होऊ शकेल, असेही सांगण्यात आले.
तपासाधिकारी तथा करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर म्हणाले, संशयित गायकवाड बंधूंच्या प्राथमिक चौकशीत बिहार व उत्तर प्रदेश येथील काही संशयितांची नावे निष्पन्न होत आहेत. त्यादृष्टीने तपासाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. पोलिसांची विशेष पथके एक-दोन दिवसांत रवाना होतील, असेही ते म्हणाले.
दोघा म्होरक्यांना चार दिवस पोलिस कोठडी; 16 जणांना न्यायालयीन कोठडी
‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणातील अटकेत असलेल्या म्होरक्या महेश गायकवाड याला शनिवार (दि. 29), तर राहुल पाटीलला गुरुवार (दि. 27) पर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली; तर अन्य 16 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अमोल पांडुरंग जरग (वय 38, रा. सरवडे, ता. राधानगरी, सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी), संदीप भगवान गायकवाड 46, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा), रणधीर तुकाराम शेवाळे (46, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा), तेजस दीपक मुळीक (22, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (32, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (40, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), श्रीकांत नथुराम चव्हाण (43, रा. विद्यानगर कराड, सध्या रा. उंबज), गुरुनाथ गणपती चव्हाण (38, रा. राधानगरी), नागेश दिलीप शेंडगे (30, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी), रोहित पांडुरंग सावंत (35, रा. कासारपुतळे), अभिजित विष्णू पाटील (40, रा. बोरवडे, ता. कागल), अक्षय नामदेव कुंभार (27, रा. सोनगे, ता. कागल), तर भावी शिक्षक दत्तात्रय आनंदा चव्हाण (32, रा. कासारपुतळे), किरण साताप्पा बरकाळे (30, रा. ढेंगेवाडी, सर्व ता. राधानगरी), दयानंद भैरू साळवी (41, रा. तमनाकवाडा, ता. कागल) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.