TET paper leak Case File Photo
कोल्हापूर

TET paper leak case | ‘टीईटी’ पेपर फुटी प्रकरण; 29 जणांवर न्यायालयात 800 पानांचे दोषारोपपत्र

पाचजण अद्यापही फरारच; कोल्हापूर, सांगली, सातारा ते बिहार कनेक्शन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर/मुरगूड : राज्य परीक्षा परिषदेच्या नोव्हेंबर 2025 मधील शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा कट पोलिसांनी उघडकीस आणला. या गुन्ह्यातील 29 जणांविरुद्ध सुमारे 800 पानांचे आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. 34 संशयित आरोपींचा या प्रकरणात सहभाग आहे. त्यापैकी पाच संशयित आरोपी अद्यापही फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी ‘टीईटी’ परीक्षा घेण्यात आली. तत्पूर्वी, मुरगूडजवळील सोनगे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलिसांनी ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फोडणार्‍या टोळीचा पर्दाफाश करून संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोळांकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य गुरुनाथ चौगले यांसह 18 जणांना अटक करण्यात आली. प्राचार्य चौगले हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी पेपर फोडणारा म्होरक्या होता. पोलिस तपासात पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यापासून थेट बिहार राज्यापर्यंत पोहोचल्याने तपासात निष्पन्न झाले.

पेपरफुटी प्रकरणात 34 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे. यामध्ये दत्तात्रय आनंदा चव्हाण (वय 32, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी), गुरुनाथ गणपती चौगले (38, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी), अक्षय नामदेव कुंभार (27, रा. सोनगे, ता. कागल), किरण साताप्पा बरकाळे (30, रा. ढेंगेवाडी, ता. राधानगरी), नागेश दिलीप शेंडगे (30, रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी), राहुल अनिल पाटील (31, रा. शिंदेवाडी, ता. गडहिंग्लज), दयानंद भैरू साळवी (वय 41, रा. तमनाकवाडा, ता. कागल), महेश भगवान गायकवाड (41, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा), रोहित पांडुरंग सावंत (35, रा. कासारपुतळे), अभिजित विष्णू पाटील (40, रा. बोरवडे, ता. कागल), संदीप भगवान गायकवाड (46, रा. बेलवाडी), अमोल पांडुरंग जरग (38, रा. सरवडे, ता. राधानगरी), स्वप्निल शंकर पोवार (35, रा. कासारपुतळे), रणधीर तुकाराम शेवाळे (46, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा), तेजस दीपक मुळीक (22, निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (32, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (40, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), श्रीकांत नथुराम चव्हाण (43, राय विद्यानगर, कराड), महेश नारायण बोरनाक (43, रा. बामणे, ता. भुदरगड), तानाजी मुरलीधर डोईफोडे (35, रा. आंबे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), रितेश कुमार, महंमद साहिद अझहर हुसेन (दोघे रा. पटणा, बिहार), अविनाश पांडुरंग कणेस (40, रा. शेणोली, ता. कराड), इंद्रजित प्रवीण पुस्तके (31, रा. सैदापूर), अनिल अशोक हंचनाळे (30, रा. नंदगाव, ता. करवीर), रामदास नारायण कळंत्रे (रा. सोनगे), आकाश बाबासो कदम (26, रा. बेलवाडी), दीपक चंद्रकांत कांबळे (30, रा. करवडी, ता. कराड) व दत्तात्रय आण्णासो लंबे (36, रा. बाणगे, ता. कागल) अशी आरोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

डिजिटल पुरावे, मोबाईल संवाद व आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू

‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजले. यात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील काही प्राध्यापक, शिक्षक, एजंट आणि विद्यार्थ्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सध्या अटक झालेल्या काही आरोपींची जामिनावर मुक्तता झाली आहे. पोलिसांकडून आरोपींच्या नेटवर्कचा अधिक तपास सुरू आहे. डिजिटल पुरावे, मोबाईल संवाद व आर्थिक व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समजते.

बिहार कनेक्शनमुळे तपास गुंतागुंतीचा

तपासात कराड तालुक्यातील बेलवाडी येथे पोलिस व सैन्य भरतीच्या उमेदवारांसाठी अ‍ॅकॅडमी चालवणारा महेश गायकवाड व त्याचा भाऊ संदीप गायकवाड हे दोघे काही विद्यार्थ्यांना ‘टीईटी’चा पेपर पुरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 22 नोव्हेंबर 2025 च्या रात्री छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा सूत्रधार हा बिहारचा असल्याची माहिती आहे. तपास पथक त्याच्या शोधात आहे; मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT