कोल्हापूर/मुरगूड : राज्यभरामध्ये होत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या तयारीत असणार्या टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण व मुरगूड पोलिसांनी रविवारी पहाटे कागल तालुक्यातील सोनगे येथे पर्दाफाश केला. याप्रकरणी 9 जणांना अटक केली असून आणखी 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील प्रिंटर, 90 हजार किमतीचे नऊ मोबाईल हँडसेट, 15 लाखांची कार (एमएच 12 क्यूटी 5999) व शैक्षणिक कागदपत्रे, सही असलेले कोरे धनादेश परीक्षार्थ्यांच्या नावाची यादी आणि रजिस्टर असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महेश भगवान गायकवाड (बलवडे, ता. कराड, जि. सातारा) हा या कटाचा मुख्य सूत्रधार फरार असून त्याच्या मागावर पोलिस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, अटक केलेल्या 9 जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. राज्य शासनाने नवीन शिक्षक भरतीसाठी डी.एड., बी.एड. या शिक्षण पात्रतेसह टी.ई.टी. परीक्षा (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे.
सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्यांनाही अंतिम पात्रतेसाठी टीईटी बंधनकारक केले आहे. सध्या सेवेत असणारे शिक्षक गुरुनाथ गणपती चौगले (38, रा. राधानगरी), नागेश दिलीप शेंडगे (30, रा सावर्डे पाटणकर), रोहित पांडुरंग सावंत (35, रा कासारपुतळे, ता. राधानगरी), अभिजित विष्णू पाटील (40, रा. बोरवडे, ता. कागल), अक्षय नामदेव कुंभार (27, रा सोनगे, ता. कागल) यांच्यासह भावी शिक्षक दत्तात्रय आनंदा चव्हाण (32, रा. कासारपुतळे), किरण सातापा बरकाळे (30, रा. ढेंगेवाडी, सर्व ता. राधानगरी), राहुल अनिल पाटील (31, रा. शिंदेवाडी, ता. गडहिंग्लज), दयानंद भैरू साळवी (41, रा. तमनाकवाडा, ता. कागल) अशी अटक केलेल्या 9 जणांची नावे आहेत. दरम्यान, रात्री उशिरा संदीप भगवान गायकवाड (रा. सातारा) याला ताब्यात घेतले आहे. या कटातील अन्य 7 साथीदारांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रविवारी राज्यभर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेऊन परीक्षेपूर्वी पेपर देतो, असे सांगून फसवणूक करणारी टोळी कागल व राधानागरी तालुक्यात कार्यरत असल्याची माहिती खबर्याकडून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या विशेष पथकाने मुरगूड पोलिसांच्या सहाय्याने सापळा रचून सोनगे (ता. कागल) येथील गुरुकृपा फर्निचर मॉलमध्ये थांबलेल्या टोळीला अटक केली. या प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विशेष शाखा या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. दरम्यान, टीईटी पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद केल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले. या टोळीची व्याप्ती पाहता यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
टोळीतील दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे दोघे राधानगरी तालुक्यातील असून ते टीईटी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर परीक्षार्थ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन पेपरची झेरॉक्स देणार होते. त्यासाठी संबंधितांना सोनगे (ता. कागल) याठिकाणी बोलावून त्यांच्याकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्येकाकडून कोरे धनादेश आणण्यास सांगितले होते. या दरम्यान पोलिसांनी सर्वांना अटक केली.