कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे वर्ष असणार्या व कोरोनानंतर झालेल्या दहावीच्या ऑफलाईन परीक्षेत कोल्हापूरने चौथ्या क्रमांकावरून थेट दुसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलीच हुश्शार ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 0.89 ने जास्त आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात 84.54 टक्के गुणांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष महेश चोथे, प्रभारी सचिव डी. एस. पोवार, सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्यासह प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीचा निकाल हा बेस्ट ऑफ फाईव्हनुसार आहे.
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत 2 हजार 310 माध्यमिक शाळांमधील 2 हजार 108 परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. कोल्हापूर विभागातून 1 लाख 30 हजार 835 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 28 हजार 884 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 98.50 टक्के आहे. विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 98.99 टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल 98.10 टक्के आहे. यामध्ये मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 54 हजार 30 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 53 हजार 933 विद्यार्थी परीक्षेला बसले. 53 हजार 364 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 98.94 टक्के आहे. सांगली जिल्ह्यातून 38 हजार 506 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 38 हजार 301 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 37 हजार 576 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 98.10 टक्के आहे. सातारा जिल्ह्यातून 38 हजार 761 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 38 हजार 601 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 37 हजार 944 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 98.29 टक्के आहे.
कोल्हापूर विभागातून 3 हजार 299 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 231 विद्यार्थी परीक्षेला बसले. 2 हजार 573 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 79.63 टक्के आहे. शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून 1 हजार 143 जणांनी नोंदणी केली. यापैकी 954 उत्तीर्ण झाले. निकालाची 85.48 टक्के आहे.
कोल्हापूर विभागात दहावीच्या परीक्षेत 11 गैरप्रकार आढळले. ते चौकशीत दोषी आढळल्याने त्यांची गैरमार्ग केलेल्या विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी हीींिं:/र्/ींशीळषळलरींळेप.ाह-ीील.रल.ळप या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. त्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरता येईल. गुणपडताळणीसाठी 20 ते 29 जून या काळात मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
उत्तरपत्रिका छायाप्रती मागणी ई-मेल, संकेतस्थळ, हस्तपोहोच, रजिस्टर पोस्ट यापैकी कोणत्याही एका पर्यायाने करता येईल. विद्यार्थ्यांना 20 जून ते 9 जुलै दरम्यान, ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे गरजेचे आहे. छायाप्रत मिळाल्यापासून त्या पुढील पाच दिवसांच्या काळात ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वाटपाबाबत अद्याप राज्य मंडळाने निर्णय जाहीर केलेली नाही, अशी माहिती विभागीय मंडळ प्रभारी सचिव पोवार यांनी दिली.