करनूर : हिंदू-मुस्लिम तणावानंतर दोन्ही बाजूंचा जमलेला जमाव. 
कोल्हापूर

Social Media controversy post | हिंदू-मुस्लिम गटांत दगडफेक, वाहनांची तोडफोड

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवरून करनूर येथे तणाव

पुढारी वृत्तसेवा

कागल : कागल तालुक्यातील करनूर येथे सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हिंदू-मुस्लिम समाजातील तरुणांच्या दोन गटांत जोरदार वाद होऊन त्याचे पर्यवसान दगडफेक आणि हिंसाचारात झाले. ग्रुपवर व्हायरल झालेला व्हिडीओ आणि त्यातील मजकुरावरून गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, रात्री उशिरापर्यंत कागल पोलिस ठाण्याच्या आवारात दोन्ही बाजूंचे तरुण मोठ्या संख्येने जमले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तरुणांच्या एका सोशल मीडिया ग्रुपवर समाजाच्या भावना दुखावणारा व्हिडीओ आणि मजकूर व्हायरल झाला होता. या पोस्टवर काही तरुणांनी तीव्र आक्षेप घेतला. याच कारणावरून दोन्ही बाजूंच्या तरुणांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना मारहाण करण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली. हा वाद मिटवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र चर्चा सुरू असतानाच पुन्हा बाचाबाची होऊन किरकोळ हाणामारी झाली.

हा प्रकार वार्‍यासारखा गावात पसरताच दोन्ही गटांचे शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. प्राथमिक शाळा आणि चावडीसमोरील चौकात दोन्ही जमाव आमने-सामने आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन ते चारजण किरकोळ जखमी झाले असून, चौकात उभ्या असलेल्या चारचाकी आणि काही दुचाकींची तोडफोड करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला; मात्र यावेळी झालेल्या दगडफेकीचा फटका पोलिसांनाही बसला. काही वेळातच एक जमाव घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एकत्र आला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी फौजफाट्यासह करनूरमध्ये धाव घेतली. आरसीपीच्या तुकड्या आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

पोलिसांचे संचलन; तरुणांना शांततेचे आवाहन

पोलिस अधिकारी आणि गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तरुणांना शांततेचे आवाहन करत घरी जाण्याची विनंती केली, त्यानंतर तणाव निवळला. या मोहिमेत अतिरिक्त पोलिसप्रमुख धीरजकुमार, पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, गंगाधर घावटे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून करनूर आणि रामकृष्णनगर भागात पोलिस संचलन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कागल पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या गावात शांतता असली, तरी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT