लक्ष्मीपुरीत तणाव  
कोल्हापूर

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीत तणाव; परिसराची छावणी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाच्या समर्थनाचा स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावाने सुमारे तीन तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. 'जय श्रीराम'चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केले. संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाडली. बघता-बघता बिंदू चौक ते दसरा चौक, बिंदू चौक ते शिवाजी रोड, लुगडीओळ, कोंडाओळ, अकबर मोहल्ला तसेच सीपीआर चौक परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार येथे हातगाड्या उलटविल्या, काही दुकानांवर दगडफेक झाली. जमाव दुकाने बंद करत या परिसरातून फिरत होता. त्यामुळे काही काळ दुकाने बंद राहिली.

दुपारपासून लक्ष्मीपुरीत तणाव वाढत होता. चिमासाहेब चौकातील काही हातगाड्यांवरील साहित्य संतप्त जमावाने फेकून दिले. टाऊन हॉलमागील एका चिकन सेंटरची तोडफोड केली. संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. परंतु, जमाव तोडफोड करत सुटला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शहरातील सर्व पोलिस फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला.

शहर पोलिस अधीक्षक अजित टिके हे वारंवार हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून जमाव शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्टेटस ठेवणार्‍या संशयितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. पोलिसांनी जमावाला पांगवायला सुरुवात केली. चारही बाजूला कार्यकर्ते पांगले मात्र ते घोषणाबाजी करतच आपापल्या मार्गाने निघून जात होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आपली वाहने कार्यकर्त्यांच्या मागे लावली. कार्यकर्ते त्यांच्या विभागापर्यंत पोहोचेपर्यंत पोलिस त्यांच्या मागे जात होते. काही तरुण लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापासून ते बिंदू चौक, मिरजकर तिकटीपर्यंत घोषणाबाजी करत गेले. मिरजकर तिकटीपासून पोलिसांनी त्यांना पांगविले. सायंकाळी साडेसहानंतर हा तणाव निवळला. पोलिसांनी शहरभरात पेट्रोलिंग करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावर शुकशुकाट

दुपारपासून लक्ष्मीपुरी परिसरात जमाव जमून आंदोलन करू लागल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला. दुकाने बंद झाली. बाजाराला आलेल्यांची धावपळ उडाली.

साने गुरुजी वसाहतीत दुकाने बंद पाडली

दरम्यान, रात्री उशिरा साने गुरुजी वसाहत परिसरात संतप्त जमावाने रस्त्यावर येत दुकाने बंद पाडली.

मुस्लिम समाजाने संयम, शांतता राखावी

मुस्लिम समाजाने संयम आणि शांतता राखावी, असे आवााहन पोलिस प्रशासनाने मुस्लिम बोर्डिंगमध्ये आयोजित बैठकीत केले. यावेळी मुस्लिम समाज पोलिस प्रशासनास सहकार्य करण्यास मागे राहणार नाही, अशी ग्वाही समाजाच्या नेत्यांनी दिली.

या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर त्याची जात, धर्म न पाहता कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली. यावेळी गणी आजरेकर, कादर मलबारी, तौफीक मुल्लाणी यांच्यासह मुस्लिम बोर्डिंगचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

शहरात उद्भवलेल्या तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बोर्डिर्ंगमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आणि शहर पोलिस उपधीक्षक अजित टिके यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली.

पोलिस अधीक्षकांचे शांततेचे आवाहन

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शांततेचे आवाहन केले. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. घडलेल्या घटनेतील संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. बंद कालावधीत कायदा हातात घेणार्‍यांवर पोलिसांचे लक्ष असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

धार्मिकस्थळांसमोर बंदोबस्त तैनात

शहरात दुपारपासून तणावाचे वातावरण निर्माण होताच पोलिसांनी लक्ष्मीपुरी, बिंदू चौक आदी परिसरातील धार्मिकस्थळांसमोर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT