मिणचे खुर्द : भुदरगड तालुक्यातील फये धनगरवाड्यावर घरासमोरील बकर्यांवर जंगली कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहा बकरी मृत्युमुखी पडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. भागोजी लक्ष्मण मलगोंडा यांचे एक लाखाचे नुकसान झाले. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फये येथील सोनबाच्या धनगरवाडा येथे भागोजी लक्ष्मण मलगौडा हे जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले असता बकर्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी जंगलांतून आलेल्या सहा कुत्र्यांनी बकर्यांवर हल्ला केल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने जंगली कुत्र्यांनी जंगलात धूम ठोकली; मात्र या हल्ल्यात भागोजी मलगौडा यांच्या दहा बकर्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल बळवंत शिंदे, वनरक्षक निकीता चाळक, वनसेवक धनाजी डावरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी वनविभागाच्या वतीने तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.