कोल्हापूर

Maharashtra water crisis | राज्यातील दहा धरणे कोरडी; 3500 हून अधिक गावांत टँकर!

धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वेगाने घट

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सध्या राज्यातील 10 मोठी धरणे अक्षरश: कोरडीठाक पडली आहेत, तर 3500 हून अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यात यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. बहुतांश भागात तापमानाने चाळिसी पार केलेली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर 45 पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यावर होत आहे. वाढती मागणी व वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठा घटत आहे.

पाणीसाठ्याची अवस्था!

राज्यात मोठी 138, मध्यम 264 आणि लहान आकाराची 2,626 अशी एकूण 3,028 धरणे आहेत. या सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता 1,715 टीएमसी इतकी आहे. मात्र, सध्या धरणांमध्ये 478 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणांपैकी 10 धरणे तर कोरडीठाक पडली असून, दहा-बारा धरणांमध्ये नाममात्र पाणीसाठा आहे.

धरणांमधील पाण्याची बिकट अवस्था

राज्यातील सर्वात मोठे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोरडे आहे. तसेच खडकपूर्णा (बुलडाणा), बोरगाव-अंजनपूर, सिरसमार्ग (बीड), सिद्धेश्वर (हिंगोली), सीना-कोळेगाव (धाराशिव), बिंदगीहाळ (लातूर), भावली (नाशिक), टेमघर, लोणावळा-टाटा (पुणे) ही धरणे कोरडी पडली आहेत. याशिवाय 17 मोठ्या धरणांमध्ये अवघा 10 ते 12 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे.

पाणीदार पुणे विभागात सर्वाधिक टँकर्स

राज्यातील पुणे विभाग हा सर्वाधिक ‘पाणीदार’ समजण्यात येतो. कारण सर्वाधिक 724 धरणे पुणे विभागात असून, राज्याच्या एकूण 1,715 टीएमसी पाणीसाठ्यापैकी तब्बल 650 टीएमसी पाणीसाठा पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये होतो. असे असतानाही यंदा पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांतील 175 गावे आणि 1,157 वाड्या-वस्त्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

टँकरची मागणी वाढली

तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या बहुतांश भागात दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढू लागली आहे. कोकणातील 86 गावे आणि 439 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात 230 गावे आणि 793 वाड्या, पुणे विभागात 175 गावे आणि 1,157 वाड्या, मराठवाड्यात 268 गावे आणि 73 वाड्या, अमरावती विभागात 73 गावे आणि नागपूर विभागातील 15 गावे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांमधून टँकरची मागणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे सध्या खरीप हंगामातील कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी आणि उसाच्या नव्या लागणीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढणार आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून किमान महिनाभराचा कालावधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT