देवस्थानचे सचिव कार्यभार कधी स्वीकारणार? 
कोल्हापूर

देवस्थानचे सचिव कार्यभार कधी स्वीकारणार?

केशव जाधव यांची नियुक्ती होऊन महिना उलटला, रुजू होण्यासाठी विलंबाबाबत संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवपदी केशव जाधव यांच्या नियुक्तीचे प्रशासनाकडून आदेश येऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही जाधव यांनी देवस्थानच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. सचिवपदी रुजू होण्यासाठी लागत असलेल्या विलंबाबाबत देवस्थान समितीमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जाधव सध्या मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागात अपर सचिवपदी कार्यरत आहेत.

अंबाबाई मंदिर, जोतिबा देवस्थान तसेच तीन हजारांहून अधिक देवस्थानांचे व्यवस्थापन, अंबाबाई आराखडा व जोतिबा प्राधिकरण यांसारख्या विकासकामांचा मोठा व्याप समितीकडे आहे. कार्यकारी मंडळ बरखास्त झाल्याने सध्या जिल्हाधिकारी प्रशासक आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. त्यानुसार 10 ऑक्टोबर 2025 ला मंत्रालयातील अपर सचिव केशव जाधव यांच्या देवस्थानच्या सचिवपदी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते.

जाधव यांनी यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जलपुरवठा, पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि केएमटी अशा विभागांत उल्लेखनीय काम केले आहे. मात्र नियुक्ती आदेश निघूनही जाधव अद्याप रुजू झाले नाहीत. त्यामुळे समितीमध्ये संभ्रम वाढला आहे. जाधव यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे कार्यमुक्तीची विनंती केली असून कार्यमुक्त होताच ते पदभार स्वीकारतील. मात्र एक महिना उलटूनही रुजू न झाल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. देवस्थान समितीच्या सचिवपदावरील ही अनिश्चितता केव्हा दूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाधव यांच्या नियुक्तीला स्थगिती आणण्याची चर्चा?

जाधव यांच्या नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती आणण्यासाठी प्रशासनातील काही अधिकारी प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या देवस्थान समिती वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. जाधव यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे देवस्थान समितीत शिस्त, पारदर्शकता आणि भक्त सेवेतील सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून काहींना या नियुक्तीला विलंब व्हावा, असे वाटत असल्याचेही बोलले जात आहे.

अंबाबाई विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाहीची गरज

देवस्थान समितीचे सचिवपद गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहे. सध्या प्रभारी कार्यभार धर्मादाय आयुक्त कार्यालयातील शिवराज नाईकवाडे यांच्याकडे आहे तर जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक आहेत. दरम्यान, अंबाबाई विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार असल्याने जाधव यांनी लवकरात लवकर कार्यभार स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT