कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूची तीव्रता वाढली  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : ताप वाढला डासांचा, उद्रेक झाला डेंग्यूचा

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ नाईक

कोल्हापूर : जिल्हा हिवताप कार्यालयाची डोळेझाक... गाव, प्रभागातील स्वच्छता कमिट्या सुस्त... आरोग्य विभागाचे जनजागृतीकडे दुर्लक्ष... अपार्टमेंटच्या बेसमेंट व बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी... अस्वच्छतेचा अभाव अशा कारणांमुळे डेंग्यूचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. सहा महिन्यांत कोल्हापूर शहरात 103, ग्रामीण भागात 221 असे 324 डेंग्यूबाधित, तर चिकुनगुनियाचे शहरात 34 आणि ग्रामीण भागात 69 रुग्ण सापडल्याची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे आहे; मात्र प्रत्यक्षात ही संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूची तीव्रता वाढली

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगात फणफणणारा ताप, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणे रुग्णाला दिसू लागतात. एखाद्या ठिकाणी डेंग्यूने मृत्यू झाला किंवा एकपेक्षा अधिक रुग्ण सापडले की, हिवताप कार्यालय झोपेतून जागे होते. सहा महिन्यांत डेंग्यूने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे; पण तोही संशयित आहे. पावसाळ्यात आणि थंडीत डेंग्यू डासांची तीव्रता यापूर्वी असायची. आता 12 महिने डेंग्यू आजाराचे रुग्ण सापडू लागले आहेत.

जिल्ह्यात जानेवारी ते मेअखेर अनेक गावांत डेंग्यूची साथ होती. तेव्हा डेंग्यूचे 196, तर चिकुनगुनियाचे 76 रुग्ण आढळून आले आहेत. शुद्ध साठलेल्या पाण्यामध्ये एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती होते. गतसाली जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. कागदोपत्री कामापेक्षा प्रत्यक्ष डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन उत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम 12 महिने गतिमान ठेवणे महत्त्वाचे आहे.

चार वर्षांत 2, 490 जणांना डेंग्यू

डेंग्यू, चिकुनगुनिया आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या चार वर्षांत 2 हजार 490 जणांना डेंग्यू, तर 803 जणांना चिकुनगुनिया झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे.

काही लॅबकडून रिपोर्टची लपवाछपवी

जिल्ह्यात गल्लीबोळांत पॅथॉलॉजी, लॅबोरोटरी आहेत. रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल झाला की, पहिल्यांदा त्यांच्या विविध प्रकारच्या चाचण्या करा, असा सल्ला दिला जातो. त्यानंतर पुढील उपचार सुरू केले जातात. डेंग्यू, मलेरियासह अन्य प्रकारच्या आजारांचे निदान झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेला देणे बंधनकारक आहे; पण बहुसंख्य लॅबचालक अशी माहिती कळवत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासह अन्य आजारी रुग्णांची गणती करणे प्रशासनाला अवघड होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT