कोल्हापूर : पावसाळ्यात पन्हाळा, जोतिबा परिसरासह जिल्ह्यातील डोंगराळ भागात निर्माण होणारा भूस्खलनाचा धोका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आठ ठिकाणी ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमां’तर्गंत (एमआरडीपी) उपाय योजना केल्या जाणार आहेत. त्याकरीता या भागात तांत्रिक सर्वेक्षण सुरू आहे.
जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यातील 88 गावांना भूस्खलनाचा धोका आहे. दरवर्षी भूस्खलनाच्या घटनांत वाढ होत आहे. भूस्खलन होणार्या ठिकाणांची संख्याही वाढत चालली आहे. पन्हाळा आणि जोतिबा डोंगरावरील रस्ता तसेच गगनबावडा तालुक्यातील रस्ताही भूस्खलन होऊन खचला होता. जोतिबा डोंगरावरील एक रस्ता अद्यापही बंद ठेवण्यात आला आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूस्खलनाचा मोठा धोका असलेल्या आठ ठिकाणी तातडीने उपाय योजना केल्या जाणार आहेत. याकरीता राज्य शासनाने आतंरराष्ट्रीय कंपनीची मदत घेतली आहे. या कंपनीकडील तज्ज्ञांच्या पथकाकडून या ठिकाणी सर्वेक्षण सुरू केले आहे. मे अखेर ते पूर्ण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे आवश्यक उपाय योजनांबाबतचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला जाईल. हा अहवाल राज्य शासनाकडून जागतिक बँकेकडे मान्यतेसाठी सादर होईल. ही सर्व प्रक्रिया येत्या चार महिन्यांत पूर्ण होईल आणि पावसाळ्यानंतर काम सुरू होईल, अशी शक्यता आहे.
सर्वेक्षणाचे मुख्य पैलू
मृदा आणि पाषाण चाचणी : डोंगरउतारावरील मातीची धरून ठेवण्याची क्षमता आणि खडकांमधील भेगांचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. त्याकरीता ड्रिलींग,ड्रोण सर्व्हे सुरू आहे.
पाण्याचा निचरा
पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूस्खलन होऊ नये, यासाठी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुरक्षित करण्याकरीता आवश्यक तांत्रिक तपासणी
धोकादायक दगड हटवणे
डोंगरमाथ्यावर किंवा उतारावर असलेले सैल दगड निश्चित करणे. त्यातून शास्त्रोक्त पद्धतीने काढण्याची प्रक्रिया निश्चित करणे