कोल्हापूर

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे पाणी बंद; शिंगणापुरातून पुरवठा

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईन योजनेच्या पंपहाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 25 नोव्हेंबरपासून काळम्मावाडी धरणातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे. परिणामी, शहरातील बहुतांश भागाला पूर्वीप्रमाणेच शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रांतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांतच थेट पाईपलाईनचे पाणी बंद झाल्याने योजनेच्या मेंटेनन्सचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, पंपहाऊसच्या दुरुस्तीचे काम सोमवारी रात्री उशिरा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच आणखी एक पंप सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा थेट पाईपलाईन योजनेतून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. योजनेसाठी बिद्रीहून सुमारे 30 किलोमीटर लांब विद्युतवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत.

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे 10 नोव्हेंबरला कोल्हापुरात पाणी आले. योजनेसाठी काळम्मावाडी धरण क्षेत्रात 940 हॉर्सपॉवरचे चार पंप आहेत. तीन पंप चोवीस तास कार्यरत राहणार असून, एक पंप स्टँडबाय आहे. धरण क्षेत्रातील जॅकवेलवर त्यासाठी पंपहाऊस बांधण्यात आले आहे. त्यापैकी फक्त एक पंप सुरू झाला आहे. मात्र, पंपहाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जॅकवेलमधून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे.

काळम्मावाडी धरणाचे पाणी बंद झाल्याने शहराला शिंगणापूरसह इतर उपसा केंद्रांवर अवलंबून राहावे लागले आहे. पंचगंगा नदीतून शिंगणापूर उपसा केंद्राद्वारे, तर भोगावती नदीतून बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT