कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्ती रद्द करावी व अन्य शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी शाळा बंद करून हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले. शासनाने ‘टीईटी’बाबत याचिका दाखल करावी; अन्यथा राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला. शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात केल्याबद्दल शासनाचा तीव— शब्दांत निषेध केला.
दसरा चौकातून महामोर्चाची सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाची सांगता झाली. शिक्षकांच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतले. शिक्षकांच्या महामोर्चामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा झाली. यावेळी आमदार जयंत आसगावकर म्हणाले, ‘टीईटी’संदर्भात ऑक्टोबरमध्ये मोर्चा काढला. त्यावेळी शिक्षण राज्यमंत्री यांच्या आश्वासनामुळे मोर्चा स्थगित केला. परंतु, शासनाने फसवणूक केल्याने पुन्हा मोर्चा काढावा लागला. इतर राज्यांनी ‘टीईटी’बाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या; मग महाराष्ट्र सरकारला अडचण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, 2013 पूर्वीचे शिक्षक पात्रता पूर्ण करून कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी सक्तीची ‘टीईटी’ अन्यायकारक आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘टीईटी’च्या निर्णयाविरोधात शिक्षक अखंड संघर्ष करतील. शासनाने याचे गांभीर्य ओळखावे. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी सेवेतील शिक्षकांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला; तर प्रताप ऊर्फ भैया माने यांनी, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पगार कपात न करण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. शिक्षक नेते भरत रसाळे, प्रसाद पाटील, प्रमोद तौंदकर, राहुल पवार, खंडेराव जगदाळे, राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थाचालक संघाचे शारंगधर देशमुख, डॉ. डी. एस. घुगरे, बाबासाहेब पाटील, उदय पाटील, राजेश वरक, संतोष आयरे, शरद लाड, विजयसिंह माने, दिलीप माने, राजेंद्र कांबळे, रविकुमार पाटील, अर्जुन पाटील, उमेश देसाई, रिजवान शेख आदी उपस्थित होते.
शहर, जिल्ह्यातील 2 हजार 800 हून अधिक शाळा बंद
महामोर्चात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी माध्यमांच्या सुमारे 2 हजार 882 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाली. शहर व जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत्या.
व्यापार्यांचा उत्स्फूर्त बंद
कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आकारल्या जाणार्या 1 टक्का नियमन कराविरोधात (सेस) व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी व्यापार बंदला कृषी उत्पन्न बाजार समिती आवार आणि कोल्हापुरातील व्यापारी पेठांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर आणि जिल्ह्यातील व्यापार मोठ्या प्रमाणावर बंद राहिल्याने 200 ते 250 कोटी रुपयांचा व्यापार ठप्प झाल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली.
सकाळपासूनच कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापार बंद ठेवण्यात आला होता. सकाळी 10 वाजल्यापासून विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र आले. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शाहू मार्केट यार्ड परिसरातील व्यापार पूर्णपणे ठप्प राहिला. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी या व्यापारी पेठा, राशिवडे, राधानगरी, हातकणंगले, पेठवडगाव, मुरगूड, हुपरी, कागल, कळे आदी बाजारपेठांतील उलाढाल पूर्ण ठप्प होती. कृषी उत्पन्न वगळता इतर सर्व व्यापार्यांनी या बंदला पाठिंबा दिला होता. शहरातील बाजारपेठांत विशेषतः गूळ, धान्य, भाजीपाला, फळ, मसाल्याचे सर्व घाऊक, मिरची या बाजारात अपवाद वगळता पूर्ण शुकशुकाट होता. काही भागांत किरकोळ बाजारदेखील बंद होता. व्यापार्यांची मागणी मान्य केल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आस्थापना खर्च कसा चालवायचा, हा सरकारसमोरील प्रश्न आहे. त्यामुळे सेसचा तिढा सोडवण्यासाठी सरकारला बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम न होऊ देता, व्यापार्यांना दिलासा देणारा मध्यम मार्ग काढावा लागणार आहे.
सोमवारी नागपूरला बैठक
मार्केट कमिटी सेससह व्यापार्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी (दि. 8) नागपूर येथे व्यापार्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्य कृती समितीला हे पत्र प्राप्त झाले असून, बैठकीसाठी व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी जाणार असल्याचे सांगण्यात आले.