कोल्हापूर : राज्य सरकार 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत संपूर्ण राज्यभरात दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असणार आहे. शिक्षकांनी सोमवारी बारावीचे पेपर कोल्हापूर बोर्डाकडे परत केले. कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना आ. जयंत आसगावकर, कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विषय मंजूर करून शासन आदेश काढला. परंतु चार महिने झाले तरीही शासनाने याबाबत कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात निधी मंजूर होणे आवश्यक होते. परंतु राज्य सरकारने वेळकाढूपणा केला आहे. मार्चच्या अधिवेशनात 14 ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात सर्वच विधानसभा व विधान परिषद मधील आमदारांनी तशी पत्रे सरकारला दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, शिवाजी घाटगे, भाग्यश्री राणे, रेश्मा सनदी सचिन चौगुले, रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, भारत शिरगावकर, संतोष पाटील, सचिन पाटील सावंता माळी आदी उपस्थित होते.