कोल्हापूर : पवित्र पोर्टलचे कारण देऊन शिक्षण विभागातील जून 2024 पूर्वी दिलेल्या नियुक्ती नाकारता येणार नाहीत, असा ऐतिहासिक निकाल कोल्हापूर सर्किट बेंचने दिला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी हा निकाल दिला. या निकालामुळे जून 2024 पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, संचलित यशवंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय (कोडोली) येथे अवधूत गोरखनाथ कुंभार यांची 1 ऑक्टोबर 2021 पासून संस्थेने रितसर भरती प्रक्रिया राबवून कला शिक्षक म्हणून शिक्षणसेवकपदी नियुक्ती केली आहे. मात्र, त्या नियुक्तीला जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पवित्र पोर्टलचे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारली होती. त्याविरुद्ध संस्थेने, शाळेने तसेच शिक्षक सेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली होती.
कोल्हापूर सर्किट बेंच झाल्याने ती याचिका वर्ग झाली आहे. याचिकेची नुकतीच अंतिम सुनावणी झाली. न्यायमूर्ती कर्णिक व न्यायमूर्ती देशमुख यांनी संबंधित शिक्षण सेवकाच्या नियुक्तीस वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देणेबाबत तसेच थकीत वेतन अदा करण्यासह एकूण सहा मुद्द्यांवर निकाल दिला आहे. पवित्र पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याबाबतही भाष्य केले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रशांत भावके, तर सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. बी. कालेल यांनी काम पाहिले.