कोल्हापूर : दोन दिवसांनंतर शाळा सुरू होणार आहेत, तरीही अद्याप जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांचा पत्ता नाही. शासन निर्णयानुसार 31 मे पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु निम्मा जून महिना संपला तरीही शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता मावळली आहे.
ग्रामीण भागातील मुलांसाठी आजही जिल्हा परिषद शाळांशिवाय शिक्षणासाठी दुसरा पर्याय नाही. दुर्गम, डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषदेचे शिक्षक करत असतात. या शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार पूर्वी जिल्हा परिषदेला होते; परंतु शिक्षक बदलींमध्ये चालणार्या गैरव्यवहारामुळे दरवर्षी जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्यांचा विषय गाजत होता. त्यामुळे शासनानेच शिक्षक बदलीचे अधिकार काढून घेत त्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शिक्षकांना बदल्यांचे वेध लागतात.
ऑनलाईन बदली प्रक्रियेत तीन- चार टप्पे आहेत. फेब—ुवारी महिन्यापासून बदलीच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात होते. पहिल्या टप्प्यात शिक्षकांना आपली वैयक्तिक माहिती स्वतः ऑनलाईन भरून प्रोफाईल तयार करावा लागतो. यामध्ये काही चुकीची माहिती असल्याची तक्रार आल्यास त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी होऊन तक्रार निकालात काढली जाते.
यानंतर अवघड व सुगम क्षेत्रातील गावे निश्चित केले जातात. ही प्रक्रिया मार्च महिन्यात राबविली जाते. यामध्ये दुर्गम, डोंगराळ भागातील व सुगम भागातील गावांची यादी निकषानुसार तयार केली जाते.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ही यादी तयार केली असून अवघड क्षेत्रात 169 गावांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 43 गावे राधानगरीतील, तर 39 गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. बदली प्रक्रियेची जिल्हा परिषद स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच बदल्या होतील अशी अपेक्षा शिक्षकांची होती; परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.