Teacher Protest | समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर एल्गार!  
कोल्हापूर

Teacher Protest | ‘सेवेत कायम करा, अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्या!’ : समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर एल्गार!

शाहूवाडीतील कर्मचाऱ्यांचा सहभाग, दोन दशकांपासून तुटपुंज्या मानधनावर काम, आता आर पारची लढाई करण्याचा निर्धार, बेमुदत कामबंद व अन्नत्याग आंदोलन सुरु

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड: गेल्या दोन दशकांपासून तुटपुंज्या मानधनावर आणि अनिश्चिततेच्या टांगत्या तलवारीखाली सेवा बजावणाऱ्या 'समग्र शिक्षा' अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे. "आमचे समायोजन करून सेवेत कायम करा, अन्यथा आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्या," अशा अत्यंत टोकाच्या आणि आक्रमक भूमिकेतून सोमवार (९ मार्च) पासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर बेमुदत कामबंद व अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात शाहूवाडी तालुक्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी पूर्ण ताकदीनिशी सहभागी झाल्याची माहिती संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष एस. एम. सूर्यवंशी यांनी दिली आहे.  

​२० वर्षांची सेवा, पदरी फक्त उपेक्षा!

​समग्र शिक्षा योजनेच्या माध्यमातून शिक्षण विभागाचा कणा बनलेले हे कर्मचारी गेल्या २० वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणांमुळे आजही हजारो कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मार्च २०२६ अखेर अनेक कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येत असून, पुढील चार वर्षांत सुमारे ५० टक्के कर्मचारी वयोमानानुसार निवृत्त किंवा कार्यमुक्त होणार आहेत. आयुष्याची उमेदीची वर्षे शासनासाठी खर्च करूनही उतारवयात रिकाम्या हाताने घरी जाण्याची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन.

आश्वासनांची गाजरे आणि आंदोलनाचा 'आक्रोश'

​हिवाळी अधिवेशनादरम्यान खुद्द मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काळाच्या ओघात हे आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याने कर्मचाऱ्यांनी आता 'आरपारच्या लढाई'चा पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानावर केवळ उपोषणच नव्हे, तर शंखनाद, थाळीनाद, घंटानाद आणि 'भीक मांगो' यांसारख्या अभिनव मार्गांनी शासनाचे लक्ष वेधले जात आहे. प्रशासकीय अनास्थेचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 'आत्मक्लेष' आंदोलनाचा मार्गही स्वीकारला आहे.

"दोन दशके प्रामाणिक सेवा करूनही शासनाने आमची घोर फसवणूक केली आहे. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही आता 'आरपारची लढाई' आहे. शासनाने आम्हाला सन्मानाने कायम करावे, अन्यथा आम्हाला सामूहिक स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी. या निर्धाराने आम्ही मैदानात उतरलो आहोत."
— एस. एम. सूर्यवंशी (तालुकाध्यक्ष, समग्र शिक्षा संघर्ष समिती, शाहूवाडी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT