कोल्हापूर

Kolhapur News : अडीच कोटींचा कर चुकवणार्‍या व्यापार्‍याला अटक

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रत्यक्षात कोणत्याही मालाचा पुरवठा न करता खोट्या बिलांची देवाण-घेवाण करून शासनाचा 2 कोटी 59 लाख रुपयांचा महसूल बुडविणार्‍या पाचगाव येथील हरिशचंद्र रमाकांत साळुंखे या स्क्रॅप व्यापार्‍यास महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने मंगळवारी अटक केली. अशाप्रकारे कर चुकविणार्‍यांविरोधात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अजून व्यापक कारवाई केली जाईल, असा इशारा जीएसटी विभागाने दिला आहे.

हरिशचंद्र साळुंखे याने श्रीहरी कॉपर हाऊसमधून वस्तूंच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय गुजरात राज्यातील सुरत व अहमदाबाद येथील बनावट
कंपन्यांकडून सुमारे 14.44 कोटी रुपयांची खोटी बिले सादर करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 तील तरतुदीचे उल्लंघन केले आहे. हा प्रकार उघडकीस येताच जीएसटी अन्वेषण पथकाने गुजरात येथील प्राधिकृत अधिकार्‍यांशी संपर्क साधून पुरावे मिळविले. त्यानंतर हरिशचंद्र साळुंखे याला अटक केली.

ही कारवाई राज्य कर उपायुक्त अनंत श्रीमाळे, राज्य कर उपायुक्त दीपाली चौगुले, सहायक राज्य कर उपायुक्त दयानंद पाटील व राज्य कर निरीक्षक यांच्यामार्फत संयुक्तरीत्या करण्यात आली. त्यांना कोल्हापूर क्षेत्राचे अप्पर राज्य कर आयुक्त किरण नांदेडकर व कोल्हापूर विभागाच्या राज्य कर सहआयुक्त सुनीता थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

करचुकवेगिरी रोखण्याकरिता डेटा मायनिंग, विश्लेषण व नेटवर्किंग प्रकारच्या साधनांचा वापर करण्यात येत आहे. येत्या काळात अशी कारवाई कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याचे या विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

SCROLL FOR NEXT