Tatya Tope’s Signed Letter | स्वातंत्र्य लढ्यातील तात्या टोपे यांची स्वाक्षरी असलेले पत्र सापडले 
कोल्हापूर

Tatya Tope’s Signed Letter | स्वातंत्र्य लढ्यातील तात्या टोपे यांची स्वाक्षरी असलेले पत्र सापडले

मध्य प्रदेश पुरातत्त्व विभागाच्या संशोधनात १८५७ च्या लढ्याची रणनीती सांगणारा दस्तावेज उजेडात

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : मध्य प्रदेशच्या पुरातत्त्व, अभिलेखागार आणि संग्रहालय संचालनालयात ज्ञान भारतम् अभियानांतर्गत सुरू असलेल्या अभिलेखांच्या स्कॅनिंग व डिजिटलायझेशनच्या आढाव्या दरम्यान इसवी सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील तात्या टोपे यांची मूळ स्वाक्षरी असलेले पत्र प्रकाशात आले आहे.

मूळचे कोल्हापूरचे असणारे मध्य प्रदेश पुरातत्त्व विभागाचे आयुक्त मदन नागरगोजे यांना जुन्या कागदपत्रांच्या संचात हे पत्र सापडले. त्यांनी भाषा तज्ज्ञ सय्यद नवीउद्दीन व अनमोल महाले यांच्या मदतीने बुंदेली, हिंदी मजकूर व मराठी लिपीतील पत्राचे वाचन केले. पत्रावर तात्या टोपे यांची स्वाक्षरी असल्याचे निदर्शनास आले.

रामचंद्र पांडुरंग टोपे ते सेनानी तात्या टोपे

तात्या टोपे यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी असामान्य लष्करी नेतृत्व आणि युद्धकौशल्य दाखवले. नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाशी त्यांचा निकट संबंध होता आणि उत्तर व मध्य भारतातील संघर्षात ते ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या सर्वात प्रभावी सेनानींपैकी एक बनले.

एक पत्राच्या संशोधनात १०० हून अधिक पत्रांचा उलगडा

पत्राच्या संशोधनातून १०० हून अधिक दस्तावेजांचा महत्त्वपूर्ण संग्रह मिळाला आहे. या पत्रांमधून १८५७ चा स्वातंत्र्यलढा अचानक उसळलेला उठाव नव्हता, तर विविध ठिकाणचे सरदार, सुभेदार, सैनिक आणि नेतृत्व यांच्यात सतत संपर्क, सल्ला मसलत आणि रणनीतिक समन्वय यातून झाला होता, याबाबतची माहिती मिळते. तसेच बैतूल, गाडाकोटा, ग्वाल्हेर, झाशी आणि शिवपुरी अशा मध्य भारतातील विस्तृत प्रदेशाच्या भूगोलाचीही माहिती मिळते.

पुरातत्त्व, अभिलेखागार आणि संग्रहालय संचालनालयाच्या वतीने १८५७ डिजिटल-अभिलेख गॅलरी विकसित करण्याची संकल्पना आहे. यात मूळ पत्रांचे उच्च-गुणवत्तेतील डिजिटल स्वरूप, त्यांचे लिप्यंतरण व भाषांतर, संबंधित व्यक्ती आणि घटनांची माहिती, तसेच इंटरॅक्टिव्ह नकाशांवर त्या पत्रांचा प्रवास आणि क्रांतिकारकांच्या हालचाली पाहता येतील.
मदन नागरगोजे, आयुक्त, मध्य प्रदेश पुरातत्त्व विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT