Tardal Nandani Bypass Poor Road Quality Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | तारदाळ–नांदणी बायपासच्या निकृष्ट कामावरून नागरिक आक्रमक; पॅचवर्कचे काम बंद पाडले

ठेकेदाराला वरवरची डागडुजी न करता दर्जेदार आणि टिकाऊ पॅचवर्क करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Tardal Nandani Bypass Poor Road Quality

शिरढोण : तारदाळ–नांदणी बायपास रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून स्थानिक नागरिक व शेतकरी आक्रमक झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांनी सुरू असलेले पॅचवर्कचे काम बंद पाडले. यावेळी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला केवळ वरवरची डागडुजी न करता दर्जेदार आणि टिकाऊ पॅचवर्क करण्याच्या सूचना दिल्या.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून तब्बल सहा किलोमीटर लांबीचा तारदाळ–नांदणी बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, रस्ता पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटत नाही तोच त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर तब्बल १२६ ठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी, वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी सध्या पॅचवर्क सुरू करण्यात आले आहे. मात्र, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची गुणवत्ता सुधारून मजबूत व टिकाऊ काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, निकृष्ट कामास जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष निशांत निटवे, श्रेणिक नरदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT