Takawade pollution news  
कोल्हापूर

Takawade pollution news | टाकवडे येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धारेवर

औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळे विहीर, ओढे दूषित; शेती नापीक

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : पार्वती औद्योगिक वसाहतीतील विविध प्रक्रियांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत मिसळत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी टाकवडे येथील जनवाडे मळा परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले.

पाहणीदरम्यान बालिघाटे यांनी औद्योगिक सांडपाण्यामुळे टाकवडे हद्दीतील तसेच परिसरातील ओढे-नाले व विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर अधिकारी पाटील यांनी परिसरातील ओढे-नाले तसेच दूषित पाणी येणाऱ्या विविध स्त्रोतांची पाहणी केली.

यावेळी ओढ्यातील पाणी तसेच सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या विहिरीतील पाण्याचे नमुने घेण्यात आले. काही शेतांमध्ये रासायनिक सांडपाणी गेल्यामुळे जमिनीवर रसायनांचा थर आढळल्याचेही निदर्शनास आले. संबंधित शेतकरी व विहीर मालकांनी ‘पाण्याचे नमुने घेऊनही कारवाई होत नाही; मग नमुने घेताच कशाला?’ असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, घेतलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी दिले. औद्योगिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेती तसेच पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT