जयसिंगपूर : ‘ताडोबा’तील जमीन खाण प्रकल्पाला राज्य सरकारने बेकायदेशीर मंजुरी दिली आहे. वन्यजीव व वन विभागातील अधिकार्यांनी व सदस्यांनी या खाण प्रकल्पाला विरोध केला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ताडोबातील वाघ, सिंह व वन्यप्राणी ‘वनतारा’मध्ये सोडणार का? असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जयसिंगपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
एकीकडे राज्यात व देशात वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत, तर दुसरीकडे त्याच जंगलातील खनिज संपत्ती काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. जंगलाशेजारील वस्तीतील पाळीव प्राणी वन विभागाच्या हद्दीत आले म्हणून शेकडो शेतकर्यांच्यावर गुन्हे दाखल करून जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. या अभयारण्यात उत्खनन करून जंगली हिंस्र वन्यजीव मानवी वस्तीत येणार आहेत. यामुळे शेतकर्यांचे व नागरिकांना यांचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल शेट्टी यांनी विचारला आहे.