कोल्हापूर : कृष्णाकाठच्या मेजवानीत सर्वाधिक मागणी असलेली नृसिंहवाडीची बासुंदी आता लवकरच जगभरात पोहोचणार आहे. वाडीची बासुंदी या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ खवय्यांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच; पण आता या वाडीच्या बासुंदीला जीआय मानांकन टॅग (भौगोलिक निर्देशांक) देण्यासाठी प्रस्ताव सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
नृसिंहवाडी येथील गीता एज्युकेशन अँड फाऊंडेशन या संस्थेतर्फे हा प्रस्ताव चेन्नई येथील केंद्रीय जिओग्राफीकल इंडिकेशन टॅग विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. यानंतर लवकरच नृसिंहवाडीच्या बासुंदीला पेटंट मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या पेटंटमुळे वाडीच्या बासुंदीचा दर्जा, चव, अधिकृत उत्पादन यावर शिक्कामोर्तब होईल. बुधवारी नृसिंहवाडी येथे स्थानिक उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीत प्रस्तावासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेल्या नृसिंहवाडी येथे दत्तांचे स्थान आहे. याठिकाणी दुग्धजन्य पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक बासुंदी हा पदार्थ स्थानिक उत्पादक तयार करतात. पुणे, मुंबई येथे वाडीच्या बासुंदीला मोठी मागणी आहे. शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडी येथील जवळपास 100 हून अधिक उत्पादक ही बासुंदी तयार करतात. त्यासाठी राज्यात 50 वितरकांमार्फत वाडीची बासुंदी ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. तसेच नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासाठी देशभरातील विविध राज्यात, तसेच परदेशात राहणार्या कोल्हापूरकरांनी या बासुंदीची चव जगभरात पोहोचवली आहे. वाडीच्या बासुंदीला दिवसेंदिवस वाढणारी मागणी पाहता याच नावाने बासुंदीची निकृष्ट दर्जाच्या विक्री होण्याची शक्याता नाकारता येत नाही. यासाठी पुणे येथील पेटंट तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांच्या पुढाकाराने गेल्या एक वर्षापासून वाडीच्या बासुंदीला जीआय मानांकन मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
स्थानिक स्तरावरील पदार्थांमुळे त्या प्रदेशाची ओळख जागतिक बाजारपेठेत तयार होत असते. जागतिकीकरणात ग्रामीण उत्पादने हा उद्योगवृद्धीचा गाभा मानून सध्या जीआय मानांकन व पेटंट प्रक्रियेत काम केले जात आहे. जीआय मानांकन मिळवण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील 9 खाद्यपदार्थ जीआय मानांकनाच्या कक्षेत आले आहेत. यापैकी सहा पदार्थ मराठवाड्यातील आहेत. यामध्ये आता नृसिंहवाडीच्या बासुंदीचीही वर्णी लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीत मानाचा नवा तुरा रोवण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.
एखाद्या पदार्थाचा दर्जा, स्थान, पत आणि विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये असणारी त्या पदार्थाची विशेष ओळख जपण्यासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थाच्या प्रमाणीकरणासाठी दिला जाणारा दर्जा म्हणजे भौगोलिक संकेत (जीआय). त्या पदार्थाला देण्यात आलेला दर्जा किंवा चिन्ह त्या भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधित्व करेल. या पंक्तीत आता नृसिंहवाडीच्या बासुंदीचा समावेश झाला आहे.
नृसिंहवाडीच्या बासुंदीला वेगळे वैशिष्ट्य आहे. चव तसेच परंपरा व इतिहास आहे. या बासुंदीचा रंग, पोत यांचा एक खास दर्जा आहे. त्यामुळेच ही बासुंदी खवय्यांच्या पसंतीस उतरली आहे. वाडीच्या बासुंदीचा दर्जा टिकवणे आवश्यक आहे. मूळ उत्पादक ते ग्राहक यांच्यामध्ये इतर एजंटचा समावेश असल्यामुळे बासुंदीचा दर्जा सुरक्षित राहण्यासाठी पेटंटचा उपयोग होणार आहे.गणेश हिंगमिरे, पेटंट तज्ज्ञ, पुणे