स्वाती कोरी 
कोल्हापूर

भ्रष्टाचाराचा डागही नसलेल्या समरजितना साथ द्या : स्वाती कोरी

भ्रष्टाचारी मुश्रीफांना पराभूत करण्याचे केले आवाहन

पुढारी वृत्तसेवा

उत्तूर : एकीकडे भ्रष्टाचाराने बरबटलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा डागही नसलेले, निष्कलंक, उच्चशिक्षित, छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे कागल - गडहिंग्लज - उत्तूरच्या विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. जनतेने या दोन उमेदवारांची तुलना करून मतदान करावे, असे आवाहन जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केले.

बहिरेवाडी (ता. आजरा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. दरम्यान, भादवण येथे सत्यम मंडळ व संस्कार फाऊंडेशनच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा दिला. समरजितसिंह घाटगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रणजितदादा पाटील, दिग्विजय कुराडे, दिलीप माने, सागर कोंडेकर, दयानंद पाटील, प्रकाश कुंभार, संजय धुरे, प्रवीण लोकरे, अरुण व्हरांबळे, रमेश ढोणुक्षे, विश्वजित पाटील, प्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

सौ. कोरी म्हणाल्या, हसन मुश्रीफ यांनी वडिलांसमान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी गद्दारी केली. जेष्ठ समाजवादी नेते, आमचे वडील श्रीपतराव शिंदे यांचीही फसवणूक करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांचा अपमान केला. याचा वचपा काढण्यासाठी कुणाच्या बापालाही न घाबरणारे जनता दलाचे कार्यकर्ते समरजितराजेंच्या प्रचारात आघाडीवर राहतील. समरजितसिंह घाटगे म्हणाले, उत्तूर विभागाने गतवेळी पालकमंत्र्यांची पाठराखण केली; मात्र या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोमकाकाईदेवी मंदिर सुशोभीकरणसाठी दीड कोटी मंजूर असलेल्या कामात सत्तर लाख रुपयांचेच काम केले व ऐंशी लाख पालकमंत्री व त्यांच्या लाडक्या ठेकेदाराने घशात घातले. यावेळी चंद्रकांत गोरुले, रमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुहास चौगुले यांनी स्वागत केले. उल्का गोरुले यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT