कोल्हापूर : अनंत अंबानी आणि त्यांच्या ‘वनतारा’ संस्थेचे आम्हाला सहकार्य झाले आहे. अंबानी यांच्या भूमिकेला आमचा पूर्ण आशीर्वाद आहे, असे उद्गार नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींनी काढले. ‘वनतारा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करणी यांच्यासमवेत बुधवारी सायंकाळी जैन दिगंबर बोर्डिंग येथे बैठक झाली. या बैठकीनंतर महास्वामींनी पत्रकारांशी संवाद साधला. अनंत अंबानी यांनीही महास्वामींचे आभार मानले आहेत.
महास्वामी म्हणाले, अनंत अंबानी यांनी ‘वनतारा’च्या पथकाला कोल्हापुरात पाठवले. या पथकाने आमच्या हत्तिणीबद्दलची सर्व माहिती दिली. या बैठकीत नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व ‘वनतारा’ यांच्या वतीने संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये ‘वनतारा’ने हत्तिणीचे पालन-पोषण सुविधा केंद्र उभारणीचे मान्य केले. ते म्हणाले, हत्तीण नांदणीत परत येईपर्यंत ‘वनतारा’ने आपल्याला सहकार्य करत राहावे, अशी मंगल भावना आहे. अनंत अंबानी आणि त्यांच्या परिवाराने करणी यांना पाठवले आहे. अंबानी यांच्या भूमिकेला आमचा पूर्ण आशीर्वाद आहे.
कोल्हापूर : महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीसाठी मठाच्याच जागेतच संगोपन केंद्र उभारण्याचा निर्णय नांदणी मठाचे श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि वनताराचे सीईओ विवान करणी यांच्यात दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये बुधवारी सांयकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मठ, महाराष्ट्र शासन आणि वनताराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल. त्याचा निकाल आल्यानंतर हत्तिणीची मालकी मठाकडेच राहणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, वनताराचे अधिकारी कोल्हापुरात आल्यानंतर ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या बैठकीतील निर्णयाची माहिती महास्वामी आणि वनताराचे करणी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयीन प्रक्रियेबाबत गुरुवारी मुंबईत बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले.
वनताराचे सीईओ करणी यांनी बुधवारी सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर ते विमानाने दुपारी साडेचारच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. महास्वामी यांच्यासमवेत बैठकीसाठी ते नांदणीला जाणार होते; मात्र प्रशासनाने कोल्हापुरात बैठक घेण्याचा आग्रह केल्याने सायंकाळी ही बैठक कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये निश्चित करण्यात आली. बैठक कोल्हापुरात होणार असल्याने बोर्डिंग परिसरातील तसेच बोर्डिंगकडे जाणार्या मार्गांवरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. दुपारी साडेपाचच्या सुमारास करणी यांचे आगमन झाले. यानंतर स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू झाली. या बैठकीला लक्ष्मी सेन भट्टारक महास्वामी, धर्मसेन भट्टारक महास्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खा. निवेदिता माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आ. डॉ. राहुल आवाडे, कृष्णराज महाडिक, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, वन अधिकारी धैर्यशील पाटील, करवीर प्रांत मोसमी चौगुले, जैन बोर्डिंगचे संजय शेटे आदी उपस्थित होते. बैठकीला उपस्थित व्यक्ती वगळता अन्य कोणालाही बोर्डिंगच्या आवारात सोडले जात नव्हते. सुमारे तासभर बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
पत्रकार परिषदेत बोलताना वनताराचे करणी म्हणाले, महादेवी हत्तिणीला नांदणी येथे आणण्यासाठी वनताराचे सर्वतोपरी सहकार्य असेल. हत्तिणीची मालकी नांदणी मठाकडेच असेल, तसेच वनतारामधील प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नांदणीमध्ये आणले जातील असे सांगितले. वनतारा किंवा अंबानी परिवार कधीही कोल्हापूर किंवा महादेवी हत्तिणीच्या विरोधात नव्हते. केवळ न्यायालयाच्या आदेशानुसारच महादेवी हत्तिणीला वनतारामध्ये नेण्यात आले; पण जनभावनेचा सन्मान ठेवून महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत पाठवण्यासाठी वनताराचे संपूर्ण सहकार्य असेल.
या बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी सांगितले. ते म्हणाले, नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार आणि वनतारा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेत वनताराने हत्तीच्या पालन पोषणाचे सुविधा केंद्र उभारण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
ज्या दिवशी माधुरी कोल्हापुरात येईल त्याच दिवशी कोल्हापूरकर शांत होतील, अशी स्पष्ट भूमिका माजी खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. कर्नाटकातील तीन मठांतील हत्तींकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले, तर जे कोल्हापुरात माधुरी हत्तीबद्दल झाले तेच तेथे होईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
जैन बोर्डिंग परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बोर्डिंगचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात होते. साध्या वेशातील पोलिसांचीही संख्या मोठी होती. बोर्डिंगकडे येणार्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली होती. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. महादेवी हत्तीबाबत जैन बोर्डिंग येथे वनताराच्या अधिकार्यांसोबत बैठक सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावरून वार्यासारखी पसरल्यानंतर हत्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने जैन बोर्डिंग परिसरात दाखल झाले.