पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता, नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे आज (दि. २१) कोल्हापुरात आगमन झाले आहे. Swapnil Kusale
कोल्हापूर

Swapnil Kusale : स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता, नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे आज (दि. २१) कोल्हापुरात आगमन झाले. त्याचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल ७२ वर्षांनंतर इतिहास घडवणाचा कोल्हापूरच्या या सुपुत्राची जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येत आहे. त्यानंतर त्याचा सत्कार केला जाणार आहे.

पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावत स्वप्निल पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहे. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या या सुपुत्राने 'जगात भारी कोल्हापुरी' ही म्हण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सार्थ ठरवत कोल्हापूरचे नाव जगभरात गाजवले आहे. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेत भर घालत ऐतिहासिक कामगिरी करून आज सकाळी त्याचे रणरागिणी ताराराणी चौकात झाले. यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी स्वप्निलच्या स्वागतासाठी ताराराणी चौकात उपस्थिती लावली.

दरम्यान, ताराराणी चौक ते दसरा चौक अशी स्वप्निलची मिरवणूक काढण्यात येत आहे. ढोल-ताशा, हलगी व झांजपथकाच्या गजरात ही मिरवणूक सुरू आहे.  या मिरवणुकीत स्वप्निलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे

मिरवणूक दसरा चौकात आल्यानंतर स्वप्निलचा सत्कार केला जाणार आहे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात जिल्ह्याच्या वतीने स्वप्निलला मानपत्र देण्यात येणार आहे. या मिरवणुकीत व सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, विविध संस्था, संघटना आदी उपस्थित राहणार आहेत. सत्कार सोहळ्यानंतर स्वप्निल छत्रपती शिवाजी चौकात युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहे. यानंतर भवानी मंडपातील क्रीडास्तंभाला भेट देणार आहे. क्रीडास्तंभावरील यशस्वी खेळाडूंच्या यादीत स्वप्निल याचेही नाव फोरण्यात आले आहे. या नामफलकाचे अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे. यानंतर तो करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहे. यानंतर क्रशर चौकमार्गे कांबळवाडी या आपल्या गावी रवाना होणार आहे. मार्गात ठिकठिकाणी त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. गावातही जल्लोषी मिरवणुकीचे नियोजन केले आहे.

स्वागत कमानी, कटआऊटस्‌ने सजला मिरवणूक मार्ग

वन विभागाच्या सजवलेल्या वाहनातून स्वप्निलची मिरवणूक काढण्यात येत आहे. या वाहनात स्वप्निलचे प्रशिक्षक, आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्य आहेत, सुरक्षेच्या कारणास्तव या वाहनाभोवती सुरक्षा यंत्रणेचे कडे आहे. संपूर्ण मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, स्वप्निलचे कटआऊटस् लावण्यात आले आहेत, जागोजागी रांगोळयाही काढण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावर स्वप्निलवर पाच हजारांवर तरुणांकडून पुष्णवृष्टी केली जाणार आहे.

वाहतूक मार्गात बदल

स्वप्निलच्या मिरवणुकीमुळे कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी आठपासून पुणे-बंगळूर महामार्गावरून ताराराणी चौकाकडे येणारी चाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत एस.टी. वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT