कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील नेमबाज स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे.  Pudhari News Network
कोल्हापूर

Swapnil Kusale |अभिमानास्पद! कांबळवाडीच्या 'स्वप्निल'ची पॅरिस ऑलिंपिकसाठी निवड

पुढारी वृत्तसेवा
आशिष पाटील

गुडाळ : इयत्ता नववीत शिकताना नेमबाजीत राज्य पातळीवरील पहिले सुवर्णपदक जिंकले. तेव्हाच ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे स्वप्न पाहिलेला स्वप्निल पॅरिस ऑलिंपिक मध्ये निश्चितपणे पदक मिळवून देशाचे नाव उज्वल करेल, असा ठाम विश्वास कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश आणि मातोश्री तथा कांबळवाडी च्या लोकनियुक्त सरपंच अनिता कुसाळे यांनी व्यक्त केला.

प्रत्येक खेळाडूंना 50 लाखांचे बक्षीस

महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिंपिक मध्ये पात्र ठरलेल्या भारतीय संघातील खेळाडूंना राज्य सरकारने मिशन लक्ष्यवेध मोहिमेअंतर्गत विशेष बाब म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या खेळाडू मध्ये स्वप्निल कुसाळेचाही समावेश आहे . या पार्श्वभूमीवर कुसाळे दांपत्याने शासनाचे आभार मानत स्वप्निल निश्चितपणे पदकाला गवसणी घालेल, असा विश्वास दै. पुढारी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज

भारतीय रेल्वे मध्ये टीसी असणारा स्वप्निल पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये नेमबाजीचा नियमित सराव करतो. ऑलम्पिक साठी भारतीय नेमबाज संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज आहे.

50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट मध्ये नेमबाजी करणार

ऑलम्पिक मध्ये पात्र ठरल्यानंतर गेली काही दिवस तो दिल्लीतील रेंजवर सराव करीत आहे. 2020 च्या टोकीयो ऑलिंपिक पात्रता फेरीत अगदी काठावर संधी हुकलेल्या स्वप्निल ने 2024 च्या ऑलम्पिक साठी पात्रता फेरीतून आपले स्थान निश्चित केले आहे. पॅरिस ऑलम्पिक मध्ये तो 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट मध्ये नेमबाजी करणार आहे. फ्रान्समधील पॅरिस मध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेकडे कुसाळे कुटुंबीयांसह कांबळवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

एशियन गेम्स स्पर्धेत देशाला दोन सुवर्णपदके

2015 मध्ये एशियन गेम्स स्पर्धेत देशाला दोन सुवर्णपदके जिंकून दिल्यानंतर रेल्वेने स्वप्निल ला तिकीट चेकर (टी सी) म्हणून सेवेत घेतले. त्यानंतर कैरो, चीन मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसह अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदके मिळवून ही रेल्वेने गेली नऊ वर्ष स्वप्निल ला टीसी पदावरून बढती दिलेली नाही. ऑलम्पिक साठी पात्र ठरेपर्यंतही या मराठमोळ्या खेळाडूचा भारतीय रेल्वेने उचित सन्मान केलेला नाही, ही मात्र, निश्चितपणे खेदाची बाब आहे.

SCROLL FOR NEXT