कोल्हापूर

महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज स्वच्छता अभियान

दीपक दि. भांदिगरे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात अरुण नरके फाऊंडेेशनच्या व आरोग्य विभाग, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हे अभियान होईल. यात यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज, मेन राजाराम हायस्कूल -कॉलेज, डी. डी. शिंदे कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल-कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

याशिवाय दुपारी 3 वाजता, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन हायस्कूल परिसरातील महात्मा गांधी यांच्या स्मृती जपणार्‍या स्थळाची स्वच्छता होणार आहे. 1927 मध्ये महात्मा गांधी यांनी कोल्हापूरला भेट दिली होती. तपोवन येथील चरखा आश्रमाची कोनशीला त्यांच्या हस्ते बसवण्यात आली होती. स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने म. गांधी यांच्या कोल्हापूर भेटीला उजाळा मिळणार आहे. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कोल्हापूर वन्यजीव विभागाच्या वतीने राधानगरी येथील ऐतिहासिक हत्ती महल परिसराची स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार आहे.

महात्मा गांधी यांच्या हस्ते चरखा आश्रमाची पायाभरणी

गांधी विचारांनी भारावलेले विद्यापीठ हायस्कूलमधील शिक्षक गोपाळराव मेथे यांनी कोल्हापुरात चरखा संघाची स्थापना केली (1920-21). हायस्कूलचे संस्थापक दिक्षीत गुरुजी, माजी मुख्याध्यापक के.आर. कुलकर्णी यांच्या साथीने त्यांनी तपोवन आश्रमातील विद्यार्थी अनंतराव कटकोळे, बाबूअण्णा कोठावळे, अनंतराव भुर्के, अनंतराव पार्टे या विद्यार्थ्यांसह इंग्रजांचा विरोध झुगारून स्वदेशी मार्गाचा अवलंब केला.

तपोवन आश्रमाच्या वतीने कोल्हापुरात 25 मार्च 1927 रोजी खादी प्रदर्शन भरविण्यात आले. यानिमित्ताने तपोवन चरखा आश्रमाची पायाभरणी महात्मा गांधी यांच्या हस्ते झाली. यानंतर काही वर्षे रखडलेले चरखा आश्रमाचे काम 1936 ला पुन्हा सुरू झाले. मुख्याध्यापक के. आर. कुलकर्णी यांच्यानंतर दादा परांजपे व जयवंतराव सरनाईक यांनी चरखा आश्रमाचे काम अखेरपर्यंत सुरू ठेवले. अशा या चरखा आश्रमाच्या स्मृतींचे जतन करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वच्छता मोहीम होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT