जयसिंगपूर : जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी २५ वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगण येथे होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली असून परिषदेत उसाची पहिली उचल किती मागणी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी युवा आघाडी, स्वाभिमानी महिला आघाडी तसेच कर्नाटक रयत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेट्टी यांनी विविध साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची भेट घेऊन उसाला योग्य भाव मिळण्याबरोबरच कारखानदारांचे प्रश्न देखील शासन पातळीवर सुटावेत यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
दरम्यान, ऊस परिषदेसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी सिद्धेश्वर मंदिर परिसर व हॉटेल शांभवीसमोरील मैदान, शिरोळकडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी दसरा चौक तर कोल्हापूरहून येणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.