कोल्हापूर : ऊस दर जाहीर करा; अन्यथा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील विविध भागांत सुरू असलेली ऊसतोडणी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या मारला. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने येथे पोलिस दाखल झाले. यावेळी ताब्यात घेण्यावरून कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. झटापटीत कार्यालयाची काच फुटल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऊस दर जाहीर करा; अन्यथा ऊसतोडणी तत्काळ थांबवा, अशी मागणी केली. ऊसतोडणी न थांबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. मात्र, प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला. यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले.
याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. झटापटीमध्ये कार्यालयाची काच फुटली. त्यानंतर पोलिसांनी सौरभ शेट्टी, अरुण मगदूम, शैलेश चौगुले यांना ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.