चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
ऊस उत्पादक शेतकर्यांच्या घामाला दाम देण्यात योगदान देणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माजी आमदार उल्हास पाटील यांच्या जाण्याने आणखी एक धक्का बसला आहे. आपणच घडविलेले नेते संघटना सोडून का जातात, याचा विचार संघटनेच्या नेतृत्वाने केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जाण्याने संघटनेचे किती नुकसान होते, यापेक्षाही ज्यांच्या हितासाठी संघटना स्थापन केली, गेली 24 वर्षे धगधगता संघर्ष कायम ठेवत, ती टिकवून ठेवली, त्या ऊस उत्पादक शेतकर्यांचे काय होणार, याचा विचार कधीतरी होणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे.
मूळच्या शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून बाहेर पडून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. या संघटनेने नंतर जो काही आंदोलनाचा रेटा लावला, त्याने भल्याभल्यांना हादरा दिला. सगळा खर्च भागविल्यानंतर राहिलेल्या रकमेला गाळप केलेल्या उसाच्या टनाने गुणायचे आणि शेतकर्यांना उसाचे पैसे द्यायचे, हीच पद्धत होती. उसासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित केली, ती कागदावरच होती. त्यावेळी एमएसपीच्या अधिकारातून संघटनेने साखर सम्राटांना अक्षरश: गुडघे टेकायला भाग पाडले.
संघर्षाची ठिणगी पडल्यावर ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांची बैठक जिल्हा बँकेत झाली. 2002 मध्ये साखर कारखानदार उसाला टनामागे केवळ 460 रुपये देण्यास तयार होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. जिल्हा बँकेत संयुक्त बैठक झाली. साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आपल्या भूमिकेवर ठाम असूनही स्वाभिमानीने 800 रुपये प्रतिटनाची मागणी करून 750 रुपये पदरात पाडून घेतले. आता तर उसाला टनामागे 3 हजार 500 ते 3 हजार 600 रुपये दर मिळत आहेत.
संघटना एकसंध ठेवण्यात नेतृत्व कमी पडले
मात्र, या वाटचालीत आपल्या मुलुख मैदानी तोफेप्रमाणे आग ओकणारे लक्ष्मण वडले, ग्रामीण शैलीत दराचा प्रश्न पटवून देणारे सदाभाऊ खोत, भगवान काटे, रविकांत तुपकर, सावकार मादनाईक, उल्हास पाटील हे नेते संघटना सोडून गेले. यामागे निरनिराळी कारणे असतील, पण संघटना एकसंध ठेवण्यात नेतृत्व कमी पडले, तसेच ज्या उद्देशासाठी संघटना स्थापन केली त्याउद्देशाचे काय? याचा विचारही नेते संघटना सोडून जाण्यात मागे पडला.
संघटना टिकू नये यासाठी अनेकांचा हातभार
जग कधीच कोणासाठी थांबत नाही. परिवर्तन होतच असते. आता संघटनेच्या नेतृत्वाला नव्या तरुणांची भरती करून त्यांना दिवसेंदिवस कठीण होत जाणार्या शेतकर्यांच्या प्रश्नासाठी संघर्षाला तयार करावे लागेल. तर संघटना सोडून गेलेल्यांना नव्या पक्षात किंवा संघटनेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. कारण सामान्यांना त्यांचे प्रश्न समजावून देत त्यांना संघर्षासाठी तयार करणे, हे कोणालाच नको असते. त्यामुळे शरद जोशी यांची शेतकरी संघटना टिकू नये असे ज्यांना वाटले व त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, तेच आणि तसेच प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबतही झाले. संघटना खिळखिळी करण्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे.