कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर महिना चालू झाला, तरीही साखर कारखानदारांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू झाले आहेत. मात्र अजूनही दर जाहीर झाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनेक कारखान्यांना 3700 रुपये इतका दर द्यावा, याबाबत निवेदने दिली जात आहेत. आज सर्वात पहिल्यांदा राजाराम सहकारी साखर कारखान्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांना निवेदन देऊन यावर्षी ऊसदराची कोंडी राजाराम कारखान्यातून फोडावी, अशी मागणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली.
त्यानंतर दत्त दालमिया साखर कारखान्यात सुद्धा स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन दर जाहीर करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसांत स्वाभिमानी स्टाईलने पुन्हा आंदोलन सुरू होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
1. सन २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रूपये प्रतिटन पहिली उचल देण्यात यावी.
2. चालू गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसांत कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा.
3. पुरामध्ये बाधीत झालेल्या ऊसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी.
4. ऊस तोडणी मजुरांची मजुरी वाढूनही व तोडणी वाहतूक एफआरपी मधून कपात करूनही ऊस तोडणीसाठी शेतक-यांकडून एकरी ५ ते १० हजार रूपयांची मागणी केली जात आहे. यामुळे अशा पध्दतीने लूट करणा-या संबधित तोडणी वाहतूकदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.