मुंबई: भाजप प्रवेशानंतर सावकार मादनाईक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur Politics | राजू शेट्टी यांना धक्का : 'स्वाभिमानी'चे नेते सावकार मादनाईकांचा भाजपमध्ये प्रवेश

Savkar Madnaik joins BJP | मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; माधवराव घाटगे ठरले 'किंगमेकर'

अविनाश सुतार

संतोष बामणे

Savkar Madnaik joins BJP

जयसिंगपूर : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा भाजप प्रवेश झाला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि.२) झालेल्या कार्यक्रमात मादनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानभवनात मादनाईक यांचे स्वागत केले. दरम्यान, या प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे.

यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मादनाईक यांचा पहिलाच भाजप प्रवेश झाला. खासदार धनंजय महाडिक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजवर्धन नाईक-निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष महेश देवताळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे, जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके, विजय माणगावे, मिलिंद साखरपे, सतीश हेगाणा यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मादनाईक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. भाजप त्यांना भविष्यात पाठबळ देण्याची भूमिका घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रवेशानंतर सत्काराला उत्तर देताना मादनाईक म्हणाले, गेली पंचवीस वर्ष चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. भाजप प्रवेश करत असताना सत्तेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे दाखवून देणार आहे. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मादनाईक यांनी दोन वेळा शिरोळ विधानसभा लढवली आहे. शिवाय जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम सभापतीपदी काम करताना सामाजिक कार्याच्या मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर भाजपच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना सत्तेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा घाटगे यांनी व्यक्त केली.

माधवराव घाटगे यांची 'चाणक्य' निती

गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेत कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत सकारात्मक चर्चा सुरू ठेवली आहे. मादनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील भाजपची ताकदही वाढणार आहे. या साऱ्या घडामोडीत 'गुरुदत्त शुगर्स'चे माधवराव घाटगे यांची चाणक्य नीती भाजपच्या पथ्यावर पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT