शिरोली एमआयडीसी : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या एमआयडीसी फाट्याजवळ एका ६० वर्षीय वयोवृद्ध महिलेचा शुक्रवारी (दि.१८) मृतदेह आढळून आला. महिलेच्या मृतदेहावरील जखमांवरून तिचा घातपात झाला अपघात हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पदरीत्या असल्याचे बोलले जात आहे. मुक्ताबाई मारूती गोरे (वय ६०, पुलाची शिरोली ता. हातकणंगले) असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एमआयडीसी पहिला फाटा येथील जलाराम सिरॅमिक्स शोरूमच्या बाजूस असणाऱ्या रिकाम्या जागेत मुक्ताबाई गोरे यांचा शुक्रवारी (दि.१८) सकाळी १० वाजता मृतदेह आढळून आला. गोरे यांना शुगरचा त्रास असल्याने दोन दिवसांपासून त्या आजारी होत्या. दोन दिवसांपूर्वी रूग्णालयात उपचारासाठी जातो, असे शेजाऱ्यांना सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने माहिती समोर आली आहे. आज पहाटे रस्त्यावरून जात असताना त्यांची शुगर कमी झाल्याने चकर येवून पडल्याने त्यांच्या डोक्यात व डोळ्यास गंभीर मार लागल्याने त्या स्वतःहून रस्त्याच्या कडेला जावून पडल्या व तिथेच त्यांचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा अंदाज आहे. या महिलेच्या अंगावरील जखमा पाहून तिचा खून झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले पण श्वान तिथे घुटमळले. त्यामुळे या मृत्यूचे गुढ वाढले आहे. गोरे ही मुळची पुणे जिल्ह्य़ातील असून शिरोली येथे वीट भट्टीवर कामानिमित्त ३० वर्षापासून आपल्या पतीसोबत आली होती. काही वर्षापूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. त्याना आपत्य नसल्याने ती एकटी शिरोली येथे मिळेल ते काम करून राहत होती. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .