नागाव/कासारवाडी : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मादळे (ता. करवीर) येथे आलेल्या गांधीनगर येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. रोहित हिरालाल निरंकारी (वय 37) असे त्याचे नाव असून, हा मृत्यू अपघात की घातपात, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
रोहित हा त्याचा मित्र निखिल मोहन चावला याच्यासोबत मादळे येथील एका फार्म हाऊसवर बुधवारी सायंकाळी आला होता. फार्म हाऊसवर त्यांनी मद्यपान केले. त्यानंतर दुचाकीवरून रात्री उशिरा गांधीनगरकडे परतताना रोहित रस्त्यावर पडला. निखिलने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र रोहित काहीच प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान, रात्री उशिरा भजन करून घरी परतणार्या मादळे येथील भजनी मंडळातील महिला व पुरुषांनीही हा प्रकार पाहून रोहितला उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो उठला नाही. त्यानंतर निखिल पुन्हा फार्म हाऊसवर जाऊन झोपल्याचे सांगितले जाते.
शिरोली एमआयडीसी पोलिसांना गुरुवारी सकाळी पोलिसपाटील दीपक पारमीत यांनी माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी रोहितला तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे अधिक तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
खुनाच्या चर्चेने खळबळ
1 जानेवारी दिवशी सकाळी मादळे येथे अज्ञात व्यक्तीचा खून झाला असल्याची चर्चा मादळेसह परिसरात पसरली. या घटनेने नागरिकांत खळबळ उडाली. अनेकजणांनी तर्कवितर्क लावले.