कोल्हापूर : तिरूपतीहून कोल्हापूरला आलेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसमध्ये एक संशयास्पद बॅग आढळली. यामुळे प्रवाशांत घबराट उडाली. गाडीतून उतरत असताना चेंगराचेंगरी झाली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला. बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा आणि स्थानकावरील धावपळ त्यामुळे प्रवासीही गांगरून गेले. मात्र अर्धा तासानंतर हे मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट झाले आणि साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दिवाळी आणि सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सर्व यंत्रणा अलर्ट आहे की नाही याबाबतचे हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दुपारी सव्वाचार वाजता कोल्हापूर स्थानकात दाखल झालेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसमध्ये संशयास्पद बँक असल्याचा संदेश आल्यानंतर सर्व यंत्रणा काही वेळातच रेल्वे स्थानकावर दाखल झाली. पोलिसांनी संपूर्ण गाडी तपासली. त्यावेळी मिळालेली संशयित बॅग तपासण्यात आली. अधिक तपासणीसाठी ती बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडे देण्यात आले. यावेळी प्रवाशांच्या साहित्यांचीही तपासणी करण्यात आली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, सहायक पोलिस निरीक्षक रूपाली गोरड, रेल्वे पोलिस उपनिरीक्षक नंदिनी मोहिते, रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक पांडे, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलकुटकर, उपनिरीक्षक महादेव चौगुले आदींसह पोलिस, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल, आरोग्य विभाग रुग्णवाहिका कर्मचारी आदी उपस्थित होते.