शिये येथे पोटच्या पोरीचा खून झाल्याच्या घटनेनंतर आईने हंबरडा फोडला.   Pudhari News Network
कोल्हापूर

शिये येथील बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा
सुनील कांबळे

शिरोली एमआयडीसी : शिये (ता. करवीर) गावच्या हद्दीत एका परप्रांतीय कुटुंबातील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.२२) घडली आहे. बदलापूर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणाने राज्यातील वातावरण तापलेले असतानाच या घटनेने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. (Kolhapur News)

१९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या आठवणी ताज्या

शिये येथील श्रीरामनगर येथे रोजंदारीसाठी बिहारमधून आलेल्या एका दांपत्याच्या १० वर्षांच्या मुलीला घरातून जवळच्या उसाच्या शेतात ओढत नेले आणि तिच्यावर अत्याचार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे याच परिसरात १९ वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेच्या आठवणीने हा परिसर पुन्हा एकदा हेलावून गेला. (Kolhapur News)

बुधवारी रात्री बेपत्ता असल्याची फिर्याद

याबाबत घटना स्थळावरून आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रामनगर येथे गुडूसिंग अग्रहरी हे आपली पत्नी आणि ५ मुले यांच्यासह राहतात. ते रोजगारासाठी बिहार राज्यातून तीन वर्षांपूर्वी येथे आले आहेत. ते व त्यांची पत्नी शिरोली एमआयडीसीमधील एका कारखान्यात कामाला जातात. त्यांना तीन मुले आणि दोन मुली अशी पाच आपत्ये असून परिस्थितीमुळे शिक्षण न घेता ती घरीच असतात. बुधवारी (दि.२१) सकाळी पती पत्नी कामाला गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा मामा याठिकाणी आला आणि जेवण करून झोपला. तेव्हा गुड्डूसिंग याची १० वर्षाची मुलगी घरीच होती. दुपारनंतर मात्र, ती दिसून आली नाही. बराच वेळ वाट पाहून तिच्या आई, वडील, मामा आणि इतरांनी शोध सुरु केला. पण ती मिळून आली नाही. रात्री उशिरा नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार सपोनि पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्रभर शोध घेतला. (Kolhapur News)

मृतदेहाशेजारी अंतरवस्त्र, पायातील चपला आढळल्या

सकाळी श्वान पथक पाचरण करून शोध घेतला असता श्वानाने घरातील साहित्याचा वास घेऊन माग काढत जवळच असलेल्या उसाच्या शेतात धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी तपास करताना मुलगीचा मृतदेह मिळून आला. सपोनी पंकज गिरी यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती दिली आणि सदर घटनेचा पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबचे पथक मागवून या ठिकाणी मृतदेहाचे आणि वस्तूंचे काही नमुने घेण्यात आले. आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगीच्या मृतदेहाशेजारी काही अंतरावर तिचे अंतरवस्त्र आणि पायातील चपला पडल्या होत्या. यामुळे तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

भेदरलेली भावंडे आणि मातेचा टाहो

गुड्डूसिंग, त्याची पत्नी, ५ मुले असे हे कुटुंब पोटासाठी महाराष्ट्रात आले आणि कोल्हापुरातील एमआयडीसीतील कारखान्यात रोजंदारी करू लागले. दररोज सकाळी घराबाहेर पडल्यानंतर दहा वर्षाखालील ही पाच भावंडे एकमेकांना आधार देत एकमेकांचा सांभाळ करीत होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा मामा या ठिकाणी राहायला आला. पण तो मुलांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. काल अचानक गायब झालेली मुलगी परत येईल, या आशेने दिवस-रात्र आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. पण छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील मुलीचा मृतदेह पाहून मुलीच्या आईने टाहो फोडला. तरीही इतर नातेवाईकांना हा प्रकार फोनवरून कळवण्याचेही दुर्भाग्य तिच्या नशिबी आले. हा सर्व प्रकार भेदरलेल्या अवस्थेत इतर चार भावंडे पाहत होती. हे दृश्य पाहून तेथील सर्वांचेच मन गलबलून गेले.

योगिता कदम खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या

आज घडलेल्या खून व बलात्कार प्रकरणाने घटनेने याच परिसरात १९ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे घडलेल्या योगिता कदम खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. योगिता कदम खून प्रकरणाच्या चौकशीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. आणखी या मोर्चात खुनी आरोपी बाजीराव लोखंडे सामील झाला होता. खुनी कळताच ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर हल्ला करून उद्ध्वस्त करून टाकले होते. आज गुरुवारी झालेल्या या घटनेने आणि मागील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खुनाच्या आठवणीने हा परिसर पुन्हा हेलावून गेला.

शवविच्छेदन व न्यायवैद्यकचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला गती

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने धाव घेतली. व तपास कामात योग्य मार्गदर्शन केले. घटनास्थळी करवीर विभागीय पोलीस अधीक्षक सुजीत क्षीरसागर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सह पोलीस फाटा हजर होता. शवविच्छेदन व न्यायवैद्यकचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला गती येईल. दरम्यान, संशयित म्हणून काही जणांना ताब्यात ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT