यड्राव : एमडी ड्रग्ज प्रकरणात साडेचार महिन्यांपासून पसार असलेल्या संतोष शिवसागर केसरवानी (वय 28, रा. सुर्वेनगर, इचलकरंजी), पीयूष विजय भंडारे (21, समाज मंदिरमागे, शहापूर), रेहान रफीक महावत (28, रा. तोरणानगर, शहापूर) या तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
कोरोची येथे साडेचार महिन्यांपूर्वी 6.73 लाख रुपयांचे 134 ग्रॅम एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी अभियंता ऋषभ खरात याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर विनीत गंथडे व आकाश माने यांनाही अटक केली होती. मात्र, ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. संतोष केसरवानी हा साडेचार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. त्याचे लोकेशन उत्तर प्रदेश, बिहार येथे दाखवत होते.
पोलिस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण लागल्यामुळे त्याने मोबाईल बंद केला. गोपनीयरीत्या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला यड्राव येथील रेणुकानगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यापाठोपाठ रेहान व पीयूष यांनाही अटक केली. या प्रकरणातील साद मकानदार हा अद्याप फरार आहे. तसेच, पालनकर, करण, मॉन्टी असे संशयित पाच ते सहाजण पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत.