Kolhapur Murder Case | गाडी अंगावर घालून वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत; संशयितावर खुनाचा गुन्हा 
कोल्हापूर

Kolhapur Murder Case | गाडी अंगावर घालून वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत; संशयितावर खुनाचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

हुपरी : कौटुंबिक कारणातून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून पट्टणकोडोलीच्या ८० वर्षीय वृद्धाच्या अंगावर चारचाकी गाडी घालून ठार मारल्याप्रकरणी तक्षक दिलीप लोकरे (रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकोडोली) याच्याविरोधात हुपरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला.

साताप्पा कल्लू कांबळे (रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकोडोली) असे त्या वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेला संशयित तक्षक लोकरे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी दिली.

साताप्पा कांबळे व संशयित तक्षक लोकरे यांच्यात गेल्या चार वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. या दोन्ही कुटुंबांत वारंवार भांडणे होत असून वृद्ध कांबळे यांना संपवण्याची भाषा तक्षक लोकरे सातत्याने करीत होता. नवरात्रौत्सवानिमित्ताने साताप्पा कांबळे हे १६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला तेल घालण्यासाठी पायी जात होते. हा मोका साधून संशयित लोकरे याने कांबळे यांच्या अंगावर पाठीमागून जाणीवपूर्वक चारचाकी गाडी (क्र. एम.एच . ०९ एबी ०३१४) घालून अपघात झाल्याचा बनाव रचला होता.

यामध्ये कांबळे यांच्या डोक्याला, उजव्या हाताला व डाव्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. त्यांच्यावर कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा चंद्रकांत साताप्पा कांबळे (वय ४४, रा.तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकोडोली) यांनी हुपरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT