Dr. D.Y. Patil 
कोल्हापूर

Dr. D.Y. Patil : डी. वाय. यांनी महाराष्ट्राला एज्युकेशनल लीडरशिप दिली!

पुढारी वृत्तसेवा

सुशीलकुमार शिंदे

माजी केंद्रीय गृहमंत्री

गेल्या काही काळापासून डी. वाय. पाटील हे सार्वजनिक जीवनात सक्रिय नव्हते. तरी आमच्यात वैयक्तिक संवाद होत असे. क्वचित भेटही होत असे. प्रत्येक बोलण्यात, भेटीवेळी मायेने, आपुलकीने डी. वाय. चौकशी करत. त्यांचा तो बोलका, तेजःपुंज चेहरा आजही लख्ख आठवतो. डी.वाय. गेले यावर विश्वासच बसत नाही. अगदी परवापरवा मी कोल्हापूरला जाऊन त्यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणतज्ज्ञ गेला याचे अतिव दुःख आहे. मला अधिकावाणीने बोलणारे डी.वाय. हे अजब रसायन होते. अतिशय निरपेक्ष भावनेने मैत्र राखणारे डी.वाय. आपल्यात नाहीत, ही भावनाच मला खूप सतवत आहे.

डी. वाय. यांनी महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र फुलवले. शिक्षण क्षेत्राला त्यांनी एक प्रकारचे वैभव प्राप्त करून दिले. पहिलीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची सोय त्यांनी राज्याला करून दिली. आज त्यांच्या विद्यापीठांमध्ये देशातून, परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अशा पद्धतीची एक अभिमानास्पद गोष्ट त्यांनी महाराष्ट्रासाठी निर्माण करून दिली आहे. शिक्षणाच्या बाबतीत दूरदृष्टी असणारे ते नेते होते.

डी. वाय. दादा आणि मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकत्रित होतो. पुढे मी दिल्लीला गेलो. त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असली, तरी ते राजकारण जवळून पाहिल्यानंतर त्यात फारसे रमले नाहीत. त्यामुळे ते पुन्हा आपल्या मूळच्या शिक्षण क्षेत्रात व्यग्र झाले; पण नंतर ते राज्यपाल झाले अन्‌ मीही राज्यपाल झालो. असा एक दुर्मीळ योग आमच्या दोघांमध्ये घडला. जीवनाचा अभ्यास केलेला हा मोठा नेता होता. महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांकरिता विशेषतः मागास प्रवर्गातील, बहुजन समाजाकरिता त्यांनी शिक्षणाची उत्तम सोय करून दिली.

अगदी मागील महिन्यापर्यंत मी त्यांना कोल्हापुरात जाऊन भेटत होतो. वयपरत्वे ते भेटण्यास येणाऱ्यांना ओळखू शकत नव्हते. ओळख पटली की, ते आस्थेने विचारपूस करत होते. वय झाल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आम्ही असे ठरविले होते की, त्यांना सतत भेटून त्रासही द्यायचा नाही. सर्व नातेवाईकांना त्यांनी व्यवस्थित सर्वकाही संस्था, कॉलेजेस्‌, स्टेडियम, हॉटेल करून दिले. सर्वांना सेटल करून गेले. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक एज्युकेशनल लीडरशिप मिळाली, हे आपल्याला मान्यच करावे लागेल. महाराष्ट्राला कधीही विसर पडणार नाही, भविष्यात असा कुणी होणारही नाही, असा थोर नेता हरपला आहे.

डी. वाय. दादा साहित्यप्रेमी होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची व्यवस्था अतिशय चोखपणे केली होती. त्यावेळी अगदी षोडषवर्षीय तरुणाप्रमाणे डी. वाय. हे प्रत्येक सारस्वतांशी, साहित्यिकांशी संवाद साधत होते. जणूकाही घरचे कार्य असल्याचा त्यांचा त्यावेळचा रुतबा होता.

सोलापूरच्या मराठी साहित्य परिषदेच्या शाखेचे कार्य पाहून त्यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. यातून सोलापूरच्या साहित्य परिषद शाखेला आर्थिक स्थैर्य लाभले. डी. वाय. दादांचे हे साहित्यप्रेम सोलापूरसह महाराष्ट्राचे साहित्यिक कधीच विसरणार नाहीत. मला अजूनही आठवते २०१७-१८ साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात ना. धो. महानोर आणि रामदास फुटाणे या दोघा साहित्यिकांचे पंच्चाहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आले होते. त्यावेळी स्वतः डी. वाय. हजर होते. आणखी एक आठवण मला यानिमित्ताने नमूद करावीशी वाटते. माझ्या अमृतमहोत्सवी समारंभानिमित्त जी उत्सव समिती कार्यरत होती. त्याचे प्रमुख डी. वाय. हेच होते. हा पूर्ण समारंभ पार पडेपर्यंत म्हणजे सुमारे चाळीस दिवस स्वतः डी. वाय. सोलापुरातच मुक्कामास होते, हे विशेष.

सोलापूर जिल्ह्याशी निगडित डी. वाय. यांची आणखी एक अविस्मरणीय आठवण मला यानिमित्ताने नमूद करण्याचा मोह होतो. डी. वाय. यांचा पंढरपूरशी विशेष स्नेह होता. तेथे श्री संत गजानन महाराजांचे नवीन मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्या मंदिरास डी. वाय. यांनी सुवर्णध्वज दान दिला. त्या मंदिरावर सुवर्ण फुले उधळण्यात आली होती. त्यासाठी स्वतः डी. वाय. हे विशेष हेलिकॉप्टर घेऊन पंढरपुरात आले होते. अशा साहित्यप्रेमी, सच्चा मित्र, एज्युकेशनल लीडर, आध्यात्मिक मनोवृत्तीचा तितकाच दिलदार मनाच्या डी. वाय. यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

(शब्दांकन : संजय पाठक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT