kolhapur | सर्जिकल साहित्य घोटाळा : वैद्यकीय आयुक्तांच्या आदेशाला बगल  
कोल्हापूर

kolhapur | सर्जिकल साहित्य घोटाळा : वैद्यकीय आयुक्तांच्या आदेशाला बगल

दै. ‘पुढारी’ने केला होता भांडाफोड; पुरवठादारावर गुन्हा, अन्य अधिकारी, कर्मचारी सहीसलामत?

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महविद्यालयात सर्जिकल साहित्य व अन्य सामग्री खरेदीत झालेल्या गंभीर अनियमिततेविषयी सर्व संबंधितांवर फौैजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश चौकशी समितीने दिले. तथापि, व्यवस्थापनाने केवळ पुरवठादारावर गुन्हा दाखल करून अनेकांना अप्रत्यक्ष संरक्षण दिले आहे. यामुळे या घोटाळ्याशी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याची चौकशी करावी; अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिला आहे.

महाविद्यालयात 2024 च्या पूर्वार्धात वारेमाप दराने आणि अनावश्यक सर्जिकल साहित्य व वैद्यकीय सामग्री खरेदी केल्याची भांडाफोड दैनिक ‘पुढारी’ने केली होती. महाविद्यालयाने जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून 4 कोटी 56 लाख रुपयांची खरेदी केली. यात सर्जिकल ड्रेसिंगची खरेदी मोठ्या प्रमाणात होती. सर्व रुग्णालयांत 50 रुपये किमतीचे सर्जिकल ड्रेसिंग वापरले जात असताना 250 रुपये किमतीला मिळणारे विदेशी बनावटीचे सर्जिकल ड्रेसिंग प्रशासनाने चौपट दराने खरेदी केले. याप्रकरणी दि. 24 जुलै 2024 रोजी वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या आदेशाने चौकशी समिती गठित झाली.

या समितीने 29 जुलै रोजी सविस्तर अहवाल संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना सादर केला. त्याचे अवलोकन करून विभागाच्या उपसचिवांनी प्रशासकीय अनियमिततेवर बोट दाखवित खरेदीशी संबंधित पुरवठादार व प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध तक्रार नोंदवून प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश अधिष्ठातांना दिले. संबंधित खरेदी अधिकारी व कर्मचार्‍यांवर विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी दोषारोपपत्र व कागदपत्रे तत्काळ सादर करावीत, असे निर्देश दिले होते; परंतु प्रत्यक्षात प्रशासनाने केवळ पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि अन्य संशयितांना सहीसलामत मोकळे केले. यावर पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याचा इशारा

जिल्हा पोलिसप्रमुखांना दिलेल्या निवेदनात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकार्‍यांना शासकीय अहवाल, आदेश यांचा विचार करून निर्देशामध्ये नमूद कर्मचारी आणि अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याविषयी विनंती केली. महाविद्यालयातही निवेदन सादर करून अधिष्ठातांना विनाविलंब संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे आवाहन केले. कसूर झाली, तर संबंधित अधिष्ठातांनाही उच्च न्यायालयात दाखल होणार्‍या खटल्यामध्ये प्रतिवादी करू, असा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT